रेणापूर तालुक्यात पाणी टंचाई तीव्र; रेणा मध्यम प्रकल्पात केवळ 4 टक्के पाणीसाठा

रेणापुर तालुक्याची तहान भागवणाऱ्या तालुक्यातील एकमेव मध्यम प्रकल्प म्हणजे रेणा मध्यम प्रकल्प. तालुक्याची तहान भागवणाऱ्या रेणा प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस तीव्र उन्हामुळे झपाट्याने कमी होत आहे. वाढत्या उन्ह्यामुळे एप्रिल महिन्यात 30 सेमी पाण्याचे बाष्पीभवन झाले असून या मध्यम प्रकल्पात फक्त 4.41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रेणापुर तालूक्यात तीव्र पाणी टंचाईच्या झळा तीव्र होणार आहे.

या धरणात केवळ 4.41 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे रेणापुर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी रेणापुर तालुक्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने रेणापूर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीरही केला आहे. रेणापुर तालुक्यातील अर्ध्या गावांना रेणा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र ज्या प्रकल्पावर तालुक्याची भिस्त होती त्याच प्रकल्पात केवळ 4.41 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे संपूर्ण तालुक्याला चिंता लागली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रखरखत्या उन्हामुळे झपाट्याने पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने चारही बॅरेजेस सध्या कोरडे पडले आहेत. त्यामुळे आता पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे, अन्यथा पाणीटंचाईचे संकट बिकट होणार आहे.

या धरणातील शिल्लक असलेले पाणी हे पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या पाण्याचा वापर शेतीसाठी होणार नाही, यावर प्रशासनाची नजर आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे दररोज 10 ते 11 मिमिने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. वाढत्या उन्हामुळे एप्रिलमध्ये 30 सेमि पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. दिवसेंदिवस बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढत आहे. रेणापूर तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्प आणि व्हटी हे दोनच मोठे प्रकल्प आहेत. या रेणा मध्यम प्रकल्पावर रेणापूर 10 खेडी, पानगाव 12 खेडी, कामखेडा 5 खेडी, खरोळा तसेच बीड जिल्ह्यातील पट्टीवडगाव या गावाना या धरणातून नळ योजना असल्यामुळे पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रकल्पात सध्या 4.41 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.रेणा नदीवरील रेणापुर, घनसरगाव, जवळगा, खरोळा ही चारही बॅरेजेस कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या मध्यम प्रकल्पातील पाणी आरक्षित केले असून अवैध पाणी उपसा करण्यावर आळा घातला आहे.सध्या रेणा मध्यम प्रकल्पाची सद्यस्थिती पाहता या प्रकल्पात उपयूक्त पाणीसाठा 0.97 दलघमी, मृत पाणीसाठा 1.13 दलघमी असा एकूण पाणीसाठा 2.036 दलघमी आहे. हे पाणी 15 जूनपर्यंत पुरेल असा अंदाज आहे. त्यामुळे आता पाणी जपून वापरण्याची गरज आहे.
– श्रीनाथ कुलकर्णी, शाखा अभियंता, रेणा मध्यम प्रकल्प भंडारवाडी ता.रेणापूर जि लातूर.