साईनगरीत यंदा केवळ शाडूच्या गणेशमूर्तीं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वच्छ सर्वेक्षण व वसुंधरा अभियानात गौरवास्पद कामगिरी करणारी शिर्डी नगरपंचायत पर्यावरण रक्षणासाठी विविध पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदा साईनगरीत केवळ शाडू मातीच्या गणेश मुर्तींनाच विक्री व स्थापनेसाठी परवानगी देण्याचा निर्णय नगरपंचायतने घेतल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली. यामुळे शहरात केवळ शाडू माती, गवत आदींपासुन बनवण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेश मुर्तींनाच विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. गणेश मुर्ती बनवणाऱ्यांना व विक्रेत्यांना वेळीच संदेश देण्यासाठी नगरपंचायतने पुरेशा वेळेपूर्वी हे जाहीर केले आहे. यासाठी महसूल विभाग व पोलिसांचीही मदत घेण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष सचिन उर्फ हरिश्चंद्र कोते यांनी सांगितले.

शाडूच्या मुर्त्या प्लास्टर ऑफ पॅरीसच्या तुलनेत महाग असल्याने प्रत्येक शाळेने गणेश मुर्ती तयार करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्याचा नगरपंचायतचा प्रयत्न आहे. दर रविवारी प्रत्यक्ष अथवा कोविडमुळे ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी बनवलेले या गणेश मुर्तींची घरी प्राणप्रतिष्ठा करावी, असे आवाहनही नगरपंचायतच्या वतीने सुजीत गोंदकर व मंगेश त्रिभुवन या नगरसेवकांनी केले. यावेळी नगरसेवक अभय शेळके, जगन्नाथ गोंदकर, अशोक गोंदकर, दत्तात्रय कोते, अर्चना कोते, अनिता जगताप, योगिता शेळके, वंदना गोंदकर, संगिता शेजवळ, सविता शेजवळ, कविता निकम, छाया शिंदे, अंजली गोंदकर, अशोक गायके, रविंद्र कोते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आदी उपस्थीत होते.

या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यशाळेच्या माध्यमातून उत्कृष्ट गणपती बनवणाऱ्या प्रथम तीन विजेत्यांना बांधकाम सभापती अंजली गोंदकर व रविंद्र गोंदकर या दाम्पत्याने बक्षीसांची घोषणा केली आहे. यात प्रथम बक्षीस- आमदार राधाकृष्ण विखे पुरस्कार व रोख 21 हजार, द्वितीय बक्षीस-खासदार डॉ. सुजय विखे पाटील पुरस्कार व 11 हजार रोख तर तिसरा क्रमांक-नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर पुरस्कार व 5 हजार रूपये रोख़ तसेट मुर्ती बनवणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांना नगरपंचायतच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.