
सामना ऑनलाईन । राजौरी
श्रीनगरच्या बटमलू येथे रविवारी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत जम्मू-कश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे जवान परवेज अहमद शहीद झाले. पण या आघाताने त्यांचे कुटुंब थोडेही विचलित झाले नाही. परवेजच्या 12 वर्षांच्या मुलाने लष्करात भरती होईन. मोठा अधिकारी होईन आणि दहशतवाद्यांचा बदला घेईन, असा दृढनिश्चय बोलून दाखवला.
J&K: Family of Constable Parvez Ahmed who lost his life in an encounter with terrorists in Batamaloo area y’day say ‘Govt should make arrangements for his children&parents&provide a job to his brother.’ His son (pic 2) says ‘I want to be an Army Officer&avenge his death.’ (12.08) pic.twitter.com/WTk3tKvzP4
— ANI (@ANI) August 13, 2018
हवामान खराब असल्यामुळे परवेज यांचे पार्थिव अजूनही त्यांच्या घरी पोहोचलेले नाही. पण त्यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबाला सांगण्यात आली आहे. त्यांचा मोठा मुलगा साहील याने आपले भविष्यातील ध्येय या घटनेने निश्चित केले आहे. ‘मला माझ्या वडिलांप्रमाणे अधिकारी बनायचे आहे. त्यासाठी मी पोलीस किंवा लष्करात जाईन. मोठा अधिकारी होईन आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन.’ परवेज यांचा छोटा मुलगा 8 वर्षांचा आहे.
परवेज यांच्या कुटुंबांसमोर पेचप्रसंग
परवेज हे जम्मू-कश्मीर पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकात होते. गेल्या 8 वर्षांपासून ते कश्मीरमध्ये तैनात होते. त्यांचे 11 जणांचे कुटुंब असून घरात कमवणारे ते एकटेच होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परवेज यांच्या वडील आणि काकाने राज्य सरकारकडे मदत मागितली आहे.
दोघा दहशतवाद्यांना जिवंत पकडले
बटमलूमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी तिथे शोधमोहीम राबवली. ही मोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला आणि चकमक सुरू झाली. या चकमकीत परवेज शहीद झाले तर 2 पोलीस आणि सीआरपीएफचे 3 असे 5 जवान जखमी झाले. या दरम्यान, सुरक्षादलांनी दोघा दहशतवाद्यांना जिवंत पकडले.






























































