#CAA शाहीन बाग आंदोलनाला ‘पीएफआय’कडून फंडिंग, ईडीचा धक्कादायक खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) याविरोधात दिल्लीतील शाहीन बागमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये हा कळीचा मुद्दा झाला असून मतदानापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) याबाबत मोठा खुलासा केला आहे. शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामागे देशविरोधी शक्तींचा हात असल्याचा दावा ईडीने केला आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)कडून शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या सीएएविरोधातील आंदोलनासाठी पैसा पुरवला जात असल्याचा दावा ईडीने केला आहे. ‘टाइम्स नाऊ‘ने ईडीच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. काही राजकीय नेतेही पीएफआय प्रमुखाच्या संपर्कात होते, असाही दावा ईडीने केला आहे. आपचे नेते संजय सिंह यांनी पीएफआयशी निगडीत एका नेत्याची भेट घेतली होती, असेही ईडीने म्हटले. यावर संजय सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘मी हजारो लोकांना भेटतो. जर ईडीकडे अथवा सीबीआयकडे माझ्याविरोधात पुरावे असतील तर त्यांनी कारवाई करावी’, असे आप नेते संजय सिंह यांनी स्पष्टीकरणादाखल सांगितले. संजय सिंह यांनी पीएफाआयशी निकडीत मोहम्मद परवेज याची भेट घेतल्याचा दावा केल्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. शाहीनबाग आंदोलनामागे पीएफआय नेता मोहम्मद परवेजचा हात असल्याचा दावाही ईडीने केला आणि त्याच्याशी संजय सिंह सातत्याने संपर्कात होते असेही ईडीने म्हटले.

उत्तर प्रदेशमध्ये पीएफआयची फंडिंग
याआधी सीएए विरोधात उत्तर प्रदेशात काही आठवड्यांपूर्वी जो हिंसाचार झाला होता त्यात पीएफआयचा हात असल्याचा दावा ईडी आणि उत्तर प्रदेशच्या पोलिस महासंचालकांनी केला आहे. सीएएविरोधातील आंदोलन भडकावण्यासाठी देशभरातील विविध 73 बँक खात्यात तब्बल 134 कोटी रुपये जमा झाल्याचा दावा ईडीने केला होता. तसेच पीएफआय ही एक कट्टर संघटना समजल्या जात असून या संघटनेच्या केरळ मॉड्युलचा इसिसशी संबंध असल्याचा दावाही पोलिसांनी केला होता.