रखरखत्या उन्हातही कोल्हापुरात जनसागर उसळला; शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल

लोकशाही वाचविण्यासाठी आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणार्थ लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज मोठय़ा उत्साहात जनसागर उसळला. हलगी, कैचाळ अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात भारदस्त स्वरूपात रखरखत्या उन्हाची पर्वा न करता भव्य पदयात्रा काढण्यात आली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे दाखल करण्यात आला.

सकाळी दहा वाजेच्या सुमारास ऐतिहासिक दसरा चौक येथील सामाजिक न्याय क्रांतीचे प्रणेते, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने पदयात्रेस सुरुवात झाली. महाविकास आघाडीचे कोल्हापूर मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून जनतेला अभिवादन करीत उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यास निघाले. आमदार सतेज पाटील, जयश्री जाधव यांच्यासह राजघराण्यातील सदस्य सहभागी झाले होते. युवराज व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती पायी चालत सहभागी झाले होते. ढोल-ताशा आणि कोल्हापुरी हलगीच्या निनादात व जल्लोषात प्रमुख मार्गांवरून ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात थांबली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख संजय पवार, स्व. एन. डी. पाटील यांच्या पत्नी व ज्येष्ठ कार्यकर्त्या सरोज पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप पवार, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील आदी नेते उपस्थित होते.

रयतेच्या पाठिंब्यावर कोल्हापूर मतदारसंघातून विजयसुद्धा मिळणार – शाहू महाराज छत्रपती
रयतेच्या पाठिंब्यावर आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच रयतेच्या पाठिंब्यावरच आपल्याला विजयसुद्धा मिळणार आहे, असा दृढ विश्वासही श्रीमंत शाहू महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

जेल का जवाब वोटसे… आम आदमीचा सहभाग
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना, महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, संघटना सहभागी झाल्या होत्या. कथित मद्य घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची नाराजीही दिसून आली. आप कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग नोंदवत ‘जेल का जवाब वोट से’ हा नारा देत भाजपला पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

महागाई, गॅस सिलेंडर दरवाढीचे फलक लक्षवेधी
भाजपने निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही, याची संतप्त प्रतिक्रिया आजच्या पदयात्रेत पाहायला मिळाली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गॅस सिलिंडरचे प्रतीकात्मक पोस्टर्स घेऊन अस्सल कोल्हापुरी भाषेत महागाई आणि इंधन दरवाढीसह सामान्य लोकांच्या जगण्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. ‘तुम फेकते अन् घरदार इकते’, ‘पेट्रोल दर शंभरी पार’, ‘झुकेगा नही साला’, अशा आशयाचे परखड सवाल कोल्हापूरकरांनी फलकांच्या माध्यमातून विचारत आता मोदींच्या कसल्याही गॅरंटीला जनता भीक घालणार नसल्याचे ठणकावून सांगितले.