जगभरात सोने खरेदी का वाढलीय?

>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर

जगभरात सोन्याचे भाव गेल्या काही महिन्यांमध्ये कमालीच्या वेगाने वाढताना दिसून आले आहेत. गेल्या काही वर्षांत संरक्षण साधनसामग्री खरेदी करण्याबरोबरच सोने खरेदीकडे कल वाढत आहे. अनेक इस्लामिक देश, लॅटिन अमेरिकेतील देश, आफ्रिकन देश यांसह विकसनशील व विकसित देश सोन्याचा प्रचंड साठा करत आहेत. विशेषतः रशिया-युव्रेन युद्धानंतर हा कल अधिक वाढला आहे. आशिया खंडात सोन्याची सर्वाधिक खरेदी करणारा देश चीन आहे. यामागे अमेरिका-चीन संघर्षाची पार्श्वभूमी आहे. जागतिक पटलावरचे असुरक्षित वातावरण, अस्थिरता यामुळे राष्ट्रे सोने खरेदीला प्राधान्य देत आहेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या वाढत्या भावांमुळे या चकाकत्या आणि जिवाभावाच्या धातूच्या खरेदीदारांमध्ये काहीशी चिंता दिसून येत आहे. कारण पाहता पाहता सोन्याने 70 हजारांपर्यंत मजल मारली आहे. भारताचा विचार करता आपण प्रामुख्याने तीन गोष्टी आयात करण्यामध्ये आशिया खंडामध्ये अव्वल स्थानावर आहोत. एक म्हणजे खनिज तेल, दुसरे संरक्षण साधनसामुग्री आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सोने. आपल्याकडे सोन्याला धार्मिक महत्त्व असल्यामुळे त्याच्याकडे खरेदीचा ओघ हा वर्षानुवर्षांपासून जास्त आहे. त्यामुळे सोन्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या असल्या तरी ग्राहकांचा ओढा हा फारसा कमी झालेला दिसत नाही. जागतिक स्तरावर युद्धामुळे असेल किंवा यादवी संघर्षामुळे असेल, असुरक्षितता आणि अस्थिरता निर्माण होते, त्या त्या वेळेला सोने खरेदी वाढल्याचे दिसून येते. जागतिक पातळीवर पुरवठा साखळी विस्कळीत हेते त्या त्या वेळी सोन्यामधील गुंतवणूकही वाढलेली दिसून येते. 2020 मध्ये आलेली कोरोना महामारी असो किंवा दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले रशिया-युव्रेन युद्ध असो, या दोन्हींमुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली. त्याचा नकारात्मक परिणाम जागतिक अर्थव्यवस्थांवर झाला. जागतिक आर्थिक विकासाचा वेग मंदावला. औद्योगिक विकास, कृषी विकासदेखील मंदावले. त्यातून सुरक्षित गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने राष्ट्रांचा सुवर्ण खरेदीकडे असणारा कलदेखील वाढला. हे पहिल्यांदा घडतेय असे अजिबात नाही. अनेक देश राष्ट्रीय पातळीवर सोने खरेदी करतात, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये संरक्षण सामग्रीच्या खरेदीप्रमाणे राष्ट्रांचा कल हा प्रामुख्याने सोने खरेदीकडे वाढलेला आहे. अनेक इस्लामिक देश, लॅटीन अमेरिकेतील देश, आफ्रिकन देश, विकसनशील आणि गरीब देश सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसून येत आहेत. याचा परिणाम सोन्याचे भाव वधारण्यावर झाला आहे.

खंडामध्ये आजघडीला सोन्याची सगळ्यात जास्त आयात करणारा देश आहे चीन, पण गेल्या दोन वर्षांमध्ये चीनकडून सोन्याची खरेदी तब्बल 30 टक्क्यांनी वाढलेली आहे. यामागे प्रामुख्याने अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्षाचे महत्त्वाचे कारण आहे. आता हा संघर्ष केवळ संरक्षण किंवा सामग्री पातळीवर राहिलेला नसून तो आर्थिक पातळीवर येऊन थांबलेला आहे. डॉलर हा अमेरिकेच्या एकूणच सामर्थ्याचा मुख्य स्रोत आहे. डॉलरच्या माध्यमातून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय अर्थकारणाबरोबरच राजकारणावरही दबदबा निर्माण केलेला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी प्रामुख्याने चीन तयारी करतो आहे. चीनने यासंदर्भात एक दीर्घकालीन आराखडा आखलेला आहे, तो साधारणतः 2050 पर्यंतचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉलरवर आधारित जागतिक अर्थव्यवस्थेला आव्हान द्यायचे आणि ते आव्हान देताना युआनच्या माध्यमातून व्यापार वाढवायचा हे चीनचे उद्दिष्ट आहे. यामध्ये इतर देशांनाही युआनच्या माध्यमातून व्यापार करण्यासाठी चीन प्रवृत्त करत आहे.

कोणत्याही चलनाचे मूल्य प्रामुख्याने त्या राष्ट्राकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यावर ठरते. एखादी आपत्ती येते तेव्हा या चलनाचे अवमूल्यन होते. अवमूल्यन झाल्यामुळे विनिमयाचे खूप सारे प्रश्न निर्माण होतात. अशा वेळी राष्ट्रांकडून आणि नागरिकांकडून सोन्यावर गुंतवणूक होते. चीनला प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा करून त्या साठ्याच्या आधारावर युआनची किंमत वाढवायची आहे आणि अमेरिकेला आव्हान द्यायचे आहे. कोरोना महामारीनंतर आपली गेलेली पत पुन्हा मिळवायची असेल आणि डॉलरला खऱया अर्थाने आव्हान द्यायचे असेल तर चीनला युआनचे मूल्य प्रचंड वाढवावे लागणार आहे. युआनमधील व्यापारदेखील वाढवावा लागणार आहे. त्यामुळे चीनने आपली सोन्याची खरेदी प्रचंड प्रमाणात वाढवलेली आहे.

प्रत्येक वस्तूचा साठा करून ठेवणे ही चीनची रणनीती असते. कोरोना महामारीपूर्वी चीनने अनेक वैद्यकीय साधनांचा साठा करून ठेवला होता, तशाच पद्धतीने आता चीनकडून सोन्याचा संचय केला जात आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये असुरक्षिततादेखील निर्माण झालेली आहे. भारताचे उदाहरण घेतल्यास गेल्या 4-5 महिन्यांत आरबीआयनेदेखील साधारण 14 टन सोन्याची खरेदी केलेली आहे. गेल्या काही वर्षांतील ही सर्वाधिक मोठी खरेदी मानली जाते. हे करण्यामागचे कारणदेखील जागतिक स्तरावर निर्माण झालेली कमालीची असुरक्षितता आणि अस्थिरता हेच आहे. अशा प्रतिकूल वातावरणातील व्यवस्थापनाची रणनीती म्हणून सोन्याच्या साठवणुकीकडे पाहिले जाते. आज रशिया-युव्रेन युद्ध साधारण दोन वर्षे उलटूनही संपण्याचे नाव घेत नाहीये. आखातामधली परिस्थिती स्पह्टक बनली असून निश्चितपणे त्याचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होणार आहे. या अस्थिरतेमुळे येत्या काळातही व्यक्ती आणि राष्ट्रे दोघेही सोन्यामधील गुंतवणूक वाढव्याची शक्यता नाकारता येत नाही. थोड्यात, जागतिक परिस्थिती अस्थिर होत जाईल तसतशी असुरक्षितता वाढत जाणार आहे.

अमेरिका-चीनमधील संघर्ष भविष्यात वाढत जाऊन चलनयुद्ध अधिक तीव्र बनणार आहे. या सगळ्यांचे परिणाम हे सोन्याच्या आयातीवर होणार आहेत. हे संघर्ष मिटले नाहीत तर सोन्याच्या किमती या भविष्यातदेखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या तीन महिन्यांत सोन्याच्या किमतीत साधारणपणे 15 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साधारणतः 2000 डॉलर प्रति औस किंवा तोळा असा सोन्याचा भाव 2400 डॉलरपर्यंत पोहोचला आहे. भारतामध्ये साधारणतः ही किंमत दोन लाख इतकी होते. खरे तर 2022 पासून सोन्याच्या किमती या वाढत आहेत, परंतु गेल्या तीन महिन्यांत सोन्याच्या दरांनी घेतलेली उसळी चिंतेची बाब आहे.

खरे तर चीन हा सोन्याचा मोठ्या प्रमाणात निर्मातादेखील आहे. असे असूनही चीनने सोन्याची आयात वाढवलेली आहे. पिपल्स बँक ऑफ चायनाच्या परकीय गंगाजळीमध्ये सोन्याचा हिस्सा चीनला वाढवायचा आहे. चिनी लोकांची गुंतवणूकही प्रामुख्याने सोन्यामध्ये वाढलेली आहे. कारण चिनी लोकांना गुंतवणुकीचे पर्याय फार मर्यादित स्वरूपात आहेत. आजवर त्यांची गुंतवणूक ही प्रामुख्याने रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये होती. कारण त्यांना परदेशांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक निर्बंध आहेत. चिनी नागरिक परदेशात किती रकमेपर्यंत गुंतवणूक करू शकतात यावर चीनच्या सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे तेथील नागरिक रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पैसे गुंतवत असत, पण कोरोना महामारीनंतर चीनमधील बांधकाम उद्योग कोसळला आहे. याचाही परिणाम चिनी लोकांच्या सोन्याच्या गुंतवणुकीवर झालेला दिसत आहे.

राष्ट्रे असोत, मध्यवर्ती बँका असोत किंवा व्यक्ती असोत, सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा वाढता प्रवाह भविष्यातदेखील सुरू राहणार आहे. आज भारताच्या परकीय गंगाजळीत जवळपास 70 अब्जने वाढ झालेली आहे. सद्यस्थितीत आपण त्याआधारे प्रामुख्याने 10 महिन्यांपर्यंत आपली आयात कायम ठेवू शकतो. परकीय गंगाजळीमध्ये विदेशी चलन आणि सोने असे दोन्ही प्रकार असतात. साधारणतः पौंड, डॉलर यामध्ये विदेशी चलनाचा साठा आपल्या आरबीआयकडे असतो, पण आता आरबीआयकडील सोन्याचा साठाही वाढत चाललेला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता सोन्याच्या किमतींमध्ये तात्पुरते चढ-उतार होत राहिले तरी भविष्यात सोन्याच्या दरांचा आलेख चढताच राहणार असे दिसते.

(लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.)