
राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत झालेले नसताना आज रविवारपासून 7 ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणाला ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टी प्रभावित होणार आहे. यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
गेले दोन आठवडे मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत थैमान घातलेल्या पावसाने शुक्रवारपासून काहीशी विश्रांती घेतली असताना आता चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर आपत्तीजनक स्थितीचा सामाना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्हा स्तरावर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणमधील सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका असल्याने जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय कराव्यात, धोक्याच्या प्रसंग उद्भवण्याच्या शक्यतेने नागरिकांच्या स्थलांतरणासाठी योजना तयार ठेवाव्यात आणि समुद्र प्रवास टाळावा असे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. कोकणासह विदर्भ-मराठवाडय़ातही काही भागांत मुसळधार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
सोसाट्याचे वारे वाहणार
किनारपट्टीवर 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. हा वेग 65 किमीपर्यंत जाण्याचीही शक्यताही आहे. वाऱयाचा वेग ‘शक्ती’ वादळाच्या तीव्रतेनुसार वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पालिका सज्ज
चक्रीवादळ इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनेही आपली आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती दिली आहे. अजून परतीचा पाऊस सुरू झाला नसल्याने किनारपट्टीसह मुंबईभरात आवश्यक ठिकाणी यंत्रणा सज्ज असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.