जुन्या विश्वस्तांची मुदत पुढच्या महिन्यात संपणार, श्री शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त नेमणुकीचा कार्यक्रम जाहीर

नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानची घटना बरखास्त करून राज्य सरकारने देवस्थान ताब्यात घेतले. तसा कायदाही मंजूरही केला. मात्र, दोन वर्षे उलटून गेले तरी शासन नियुक्त विश्वस्तच नेमले गेले नाहीत. दरम्यान, डिसेंबर महिन्यात विश्वस्त मंडळाची मुदत संपत असल्यामुळे धर्मदाय आयुक्तांनी सोमवारी नव्या विश्वस्त पदाच्या नेमणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे देवस्थानवर पुन्हा एकदा गावकारभाऱयांचीच विश्वस्तपदी वर्णी लागण्याची चिन्हे आहेत.

गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांनी शनिशिंगणापूर देवस्थान कायम चर्चेत राहिले. यामध्ये भाविकांच्या सोयी-सुविधा, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, नोकरभरती, दानपात्रातील गैरव्यवहार आदी घटनांचा समावेश होता. देवस्थानची जुनी घटना बदलण्यासाठी ग्रामसभेत ठराव झाला. याबाबत माजी लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करून लक्ष वेधले. त्यामुळे तत्कालीन सरकारने 20 जून 2018 रोजी शनिशिंगणापूर देवस्थान नियंत्रणात घेऊन स्वतंत्र कायद्याची अंमलबजावणी केली. डिसेंबर 2018च्या हिवाळी अधिवेशनात देवस्थान बरखास्त करून दोन्ही सभागृहांत विधेयक मंजूर झाले. त्यावर राज्यपालांचीही स्वाक्षरी झाल्याने कायदा मंजूर झाला. कायदा मंजूर होऊनही शासन नियुक्त व प्रांत दर्जाच्या अधिकाऱयाच्या नेमणुकीची अंमलबजावणी झाली नाही.

आता जानेवारी 2016-2021 या पंचवार्षिक विश्वस्त मंडळाची मुदत डिसेंबर महिन्यात संपत आहे. याबाबत शासन पातळीवर कुठलेही आदेश नसल्याने न्यास नोंदणी विभाग, नगर सहायक धर्मदाय आयुक्तांनी पुढील पंचवार्षिक विश्वस्त मंडळाचा कार्यक्रम सोमवार (दि. 23) जाहीर केला आहे. वृत्तपत्रात जाहीर नोटीस देऊन 9 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज मागविले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या