
महाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणात अनेक सुविधा आहेत. त्यामुळे मराठी अनिवासी भारतीयांना त्यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. अनिवासी भारतीयांनी राज्यात उद्योग सुरू करून महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
आखाती देशातील अनिवासीय मराठी भारतीयांच्या विविध संघटनांनी शरद पवार यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी मराठी अनिवासी भारतीयांच्या काही समस्यांसंदर्भात चर्चाही केली. नव्या संकल्पनांवर काम करणाऱ्या स्टार्ट-अप उद्योजकांसाठी महाराष्ट्र सरकार आर्थिक सहाय्य व शासन कामकाजात संधी देऊन प्रोत्साहन देते. नवउद्योजकांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सिडबीच्या सहयोगाने व्हेंचर कॅपिटल सुविधाही उपलब्ध असल्याचे शरद पवार यांनी त्यांना सांगितले.
अनिवासी मराठी भारतीयांनी गुंतवणूक करावी म्हणून महाराष्ट्र सरकारने इझ ऑफ डुईंग बिझिनेसअंतर्गत तत्काळ महापरवाना, जागेची सहज उपलब्धता, गुंतवणूक रकमेइतका परतावा, सूक्ष्म व लघु उद्योग तसेच महिला उद्योगांसाठी वाढीव प्रोत्साहन योजनांची माहितीही शरद पवारांनी त्यांना दिली. या सर्व सुविधा सहज मिळाव्यात म्हणून एक खिडकी संकल्पने प्रमाणेच ‘मैत्री गुंतवणूक’ कक्ष स्थापण्यात आल्याचेही त्यांना सांगितले. त्यासाठी [email protected] या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.




























































