
सामना ऑनलाईन । नगर
‘शरद पवार यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाल्याचे मी पण ऐकले. काय गडी भारीय… पाहिजे ते करतो आणि रोज माझे बोट धरतो. आधी गांधी परिवाराला शिव्या घातल्या, आता माझा नंबर लागला आहे. बिनपैशाने माझी प्रसिद्धी होतेय. मी काय साधासुधा आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतील आहे. त्यामुळे अशा लुंग्यासुंग्याने टीका केली तर मी लक्ष देत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेचा समाचार घेतला. नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित शेवगाव येथील सभेत ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, आतापर्यंत गांधी घराण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिव्या घातल्या. आता आमच्या कुटुंबावर बोलत आहेत. आमच्या घरात भांडणे आहेत, असे मोदी सांगतात. अरे, स्वतःला घर नसलेले आमच्या घरात डोकावतात. राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळी ही बाई देश सोडून जाईल असे लोक म्हणत होते. मात्र, सोनिया गांधी उभ्या राहिल्या. देशासाठी योगदान दिले. तरीही नरेंद्र मोदी त्यांच्यावर टीका करीत आहेत.


























































