दानवेंकडील ज्योतिषशास्त्राचे कौशल्य आजच कळले, शरद पवार यांची बोचरी टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासदार रावसाहेब दानवे यांना राजकारणात ज्योतिषी म्हणून ओळख मिळालेली नाही. पण त्यांच्यात हे कौशल्य आहे हे मला आजच कळले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांनी भाजपचे खासदार दानवे यांची खिल्ली उडवली.

बीडमधील भाजपचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला.

राज्यात येत्या तीन महिन्यात भाजपचे सरकार येणार असल्याचे वक्तव्य भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी केले आहे याकडे शरद पवार यांचे लक्ष वेधले असता,  रावसाहेब दानवे हे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे मला माहिती नव्हते असा जबरदस्त टोला शरद पवार यांनी लगावला. रावसाहेब दानवे खासदार असून गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात आहेत. पण त्यांचा हा गुण मला माहिती नव्हता. राजकारणात त्यांना ज्योतिषी म्हणून ओळख मिळालेली नाही पण त्यांच्यात हे कौशल्य आहे हे मला आज कळले असे पवार यांनी सांगताच पत्रकारांमध्ये हास्याचा एकच स्फोट झाला.

माणसाने आशा ठेवायला हवी! फडणवीसांना टोला

सत्ता गेल्याचा त्रास होत असतो. मी समजू शकतो. त्या त्रासाच्या उद्वेगामुळे काही लोक चुकीचे शब्द वापरतात. त्यांची सत्ता गेली ही त्यांची अस्वस्थता आहे. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे म्हणत शरद पवार यांनी माणसाने काही आशा अपेक्षा ठेवलीच पाहिजे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. महाविकास आघाडी सरकारला मिळणारा जनतेचा पाठिंबा पाहून विरोधकांचे नैराश्य वाढले आहे, असेही पवार म्हणाले.