भाजपने ईडीला हत्यार बनवले; 85 टक्के कारवाया विरोधी नेत्यांवर! शरद पवार यांच्याकडून तपास यंत्रणांची पोलखोल

सत्तेत आल्यापासून भाजप ‘ईडी’चा हत्यारासारखा वापर करत आहे. भाजपच्या आतापर्यंतच्या सत्ताकाळात गेल्या काही वर्षांमध्ये ईडीकडून 121 नेत्यांची चौकशी करून कारवाई करण्यात आली. यापैकी 85 टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत. मात्र कारवाई झालेल्या लोकांमध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, याबाबत शंका उपस्थित करीत ‘ईडी’च्या धाडसत्र आणि तपासावर 404 कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला, अशी आकडेवारीच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या वतीने आयोजित शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र योजनेचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, आज देशात कोणीही भाजपच्या विचाराविरोधात भूमिका घेतली की त्याच्या विरोधात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. यापूर्वी महाराष्ट्रात ‘ईडी’ हा शब्द कोणाला माहीत नव्हता. मोदी सरकार आल्यानंतर 2014 ते 2023 या काळात भाजपकडून ‘ईडी’चा हत्यारासारखा वापर करण्यात येत आहे. गेल्या 8-9 वर्षांत ईडीकडून एकूण 6000 केसेस नोंदवल्या गेल्या. चौकशीनंतर त्यापैकी 25 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आले. यापैकी फक्त दोघांना शिक्षा झाली. फक्त विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे कारवाईचा ससेमिरा लावण्यात येत आहे. ईडीकडून गेल्या काही वर्षांत 121 नेत्यांची चौकशी करण्यात आली. यात 85 टक्के नेते विरोधी पक्षातील आहेत. यामध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नसल्यामुळे शंका उपस्थित होत आहेत. या कारवाईसाठी 404 कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला, असे शरद पवार यांनी सांगितले.

आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले, संकटातील वर्गांसाठी, लोकशाहीसाठी संघर्ष करा. संघर्ष यात्रा अनेक गोष्टी शिकवून जाते. ही संघर्ष यात्रा काढून तुम्ही महाराष्ट्रातील माणसांची मने जिंकली, त्यांना आधार दिला. तुम्ही जागृत रहा, कष्ट करा महाराष्ट्र तुमच्यासोबत राहील, असा विश्वास शरद पवार यांनी दिला.

अशा कारवायांना घाबरत नाही – रोहित पवार
राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी आणि सत्तेत राहण्यासाठी अनेक जण लढत आहेत. परंतु स्वाभिमानी जनतेसाठी लढणारे एकमेव शरद पवार आहेत, हे या संघर्ष यात्रेतून उमगले. मी 2007ला व्यवसायात आलो. 2017पासून राजकारण करतोय. सत्तेत गेलो असतो तर व्यवसाय वाढला असता; परंतु विचार कsला तर माझ्यावरील कारवाई चुकीची आहे व अशा कारावायांना मी घाबरणार नाही, असे आमदार रोहित पवार म्हणाले.

विकासासाठी पक्ष सोडला, असे म्हणणे सपशेल चूक
राज्याच्या विकासासाठी आम्ही भाजपबरोबर गेलो असे काही लोक सांगतात; परंतु हा दावा बिनबुडाचा आहे. भाजपाबरोबर गेलेल्या काही नेत्यांची पेंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला असे म्हणणे सपशेल चूक आहे, असे सांगत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक; सुप्रीम कोर्टात योग्य निर्णय होईल – शरद पवार
निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगाने आमचा पक्ष, चिन्ह काढून घेतले नाही, तर आमचा पक्ष दुसऱयाला दिला. ज्यांनी पक्ष उभारला त्यांच्या हातून पक्ष काढून दुसऱयाच्या हातात दिला. देशात असे कधी घडले नव्हते, तेही निवडणूक आयोगाने करून दाखवले. लोक या सर्व गोष्टींना समर्थन देणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयात त्याचा योग्य तो निर्णय होईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह तुमच्याकडून काढून घेतले असल्याबद्दल पवार म्हणाले, निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ हे नाव दिल़े मी पहिली निवडणूक ‘बैलजोडी’ चिन्हावर लढलो. नंतर आमचे चिन्ह गेले. चरखा चिन्हावर लढलो. नंतर आमचे चिन्ह गेले. आम्ही हाताच्या चिन्हावर लढलो. ते गेल्यावर आम्ही घडय़ाळावर लढलो. चिन्ह हे मर्यादित कामासाठी उपयुक्त असतं; पण निवडणूक आयोगाचा हा निकाल आश्चर्यकारक आहे. आयोगाने आमचा पक्ष, चिन्ह काढून घेतले नाही तर आमचा पक्ष दुसऱयाला दिला. ज्यांनी पक्ष उभारला त्यांच्या हातून पक्ष काढून दुसऱयाच्या हातात दिला. हे देशात कधी घडले नव्हते, तेही निवडणूक आयोगाने करून दाखवले. सर्वोच्च न्यायालयात योग्य निर्णय होईल, असे पवार म्हणाले.

बारामतीचे लोक हुशार आहेत
शेवटची निवडणूक म्हणून तुम्ही बारामतीतून उभे राहणार. लोकांना भावनिक करणार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याबद्दलच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, मी निवडणुकीला उभा राहणार नाही. त्यामुळे भावनिक बोलायची गरज नाही. बारामतीचे लोक हुशार आहेत, त्यांची प्रतिष्ठा कोणी वाढवली आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील.

देशात कोणीही भाजपच्या विचाराविरोधात भूमिका घेतली की त्याच्या विरोधात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. यापूर्वी महाराष्ट्रात ‘ईडी’ हा शब्द कोणाला माहीत नव्हता.
ईडीकडून गेल्या काही वर्षांत 121 नेत्यांची चौकशी करण्यात आली. यामध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नाही. त्यामुळेच ईडीच्या कारवाईवर शंका उपस्थित होत आहेत.

झुंडशाहीला जनता योग्य जागा दाखवेल
निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, पुण्यात एका जाणकार व्यक्तीवर हल्ला करून त्यांची गाडी पह्डण्यात आली. याचा अर्थ स्पष्ट आहे की, आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गाने जात आहेत. हातात सत्ता आहे, पोलीस दल आहे त्याचा गैरफायदा घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे, ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे. मात्र ही झुंडशाही जनतेला पटणारी नाही. पुण्याचा समंजस नागरिक आणि महाराष्ट्र अशा झुंडशाही प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे शरद पवार म्हणाले.