हॉटेल, पर्यटन उद्योगाला दिलासा द्या! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्रावर आलेल्या संकटाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. हॉटेल व्यावसायिकांना वीज बिल तसेच मालमत्ता करात सवलत देऊन कोरोनाच्या संकटात त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राविषयीची माहिती ट्विटरद्वारे दिली. या पत्रात शरद पवार म्हणतात, कोविड-19 या जागतिक महामारीच्या दुसऱया लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्याने पुनश्च संचारबंदीचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.  हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत मला अवगत केले. त्यांनी प्रामुख्याने मांडलेल्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना दिलासा देतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

हॉटेल, पर्यटन व्यावसायिकांच्या मागण्या

एफएल-3 परवानाधारक हॉटेल-परमीट बार मालकांना अबकारी कराचा भरणा किमान चार हप्त्यांमध्ये करण्याची सवलत द्यावी. वीज बिलात सवलत मिळावी तसेच मालमत्ता करात सूट मिळावी आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आपत्कालीन पतरेखा हमी योजना क्र. 1.0 व 2.0 अमलात आणून सदर योजनेला दिनांक 30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच पर्यटन-आदरातिथ्य व्यवसायांकरिता क्र. 3.0 योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातदेखील उद्योग-व्यवसायाला संजीवनी देणारी, रोजगाराला प्रोत्साहन देणारी योजना राबवावी, असे शरद पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.