मराठा आरक्षण आणि शेतकरी विधेयक – शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

sharad-pawar-uddhav-thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आज संध्याकाळी बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने मराठा आरक्षण, केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक व कोरोनाच्या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

या दोन नेत्यांमध्ये वर्षा निवासस्थानी संध्याकाळी सुमारे पाऊण तास बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव संजय कुमारही उपस्थित होते. रविवारी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन पुकारण्यात येणार आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारसमोर असलेल्या पर्यायांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.  त्याशिवाय राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. खास करून ग्रामीण भागात कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग, रुग्णांची वाढती संख्या यावर या भेटीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्याशिवाय केंद्राकडून जीएसटीचा येणारा परतावा व राज्यातील इतर काही महत्त्वाच्या विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात येते

राज्यांची संमती घेतली नाहीशरद पवार

केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर लोकसभेत कृषी विधेयके मंजूर केली आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबतच्या या  बैठकीत शरद पवार यांनी कृषी विधेयकावर चर्चा केली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी यावर भाष्य केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कृषी विधेयकाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सभात्याग केला. कारण कृषी हा विषय राज्यांशी संबंधित विषय आहे आणि केंद्र सरकारने देशातील राज्य सरकारांची संमती न घेता हे महत्त्वाचे विधेयक आणले.

आपली प्रतिक्रिया द्या