शरद पवार आज ‘तुतारी’ फुंकणार, रायगडावर भव्य सोहळा

राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्या किल्ले रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने ‘तुतारी’ फुंकणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला दिलेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्षचिन्हाचे किल्ले रायगडावर अनावरण होणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱया या भव्य सोहळय़ाची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही कॉपी-पेस्ट निर्णय देत पक्ष अजित पवारांच्या झोळीत टाकला. शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार असे नाव पवार यांच्या पक्षाला दिले. तसेच ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह दिले. सर्वोच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत हे चिन्ह शरद पवार यांच्याकडे असणार आहे. किल्ले रायगडावर उद्या होणाऱया या नव्या पक्षचिन्हाच्या अनावरण सोहळय़ात शरद पवार हे गद्दारांविरोधात रणशिंग फुंकणार आहेत. या सोहळय़ात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.

लक्षवेधी टिझर
‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्ष चिन्हाचे उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती शरद पवार यांच्या पक्षाच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून देण्यात आली. या कार्यक्रमाची माहिती देणारा एक खास टिझरच प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘शरद पवार साहेबांच्या साथीने विकासाचे रणशिंग फुंकले जाणार आहे,’ असे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या टिझरला अमोल कोल्हे यांचा आवाज आहे. ‘आता अवघा देश होणार दंग, शरद पवार यांच्या साथीने फुंकले जाणार विकासाचं रणशिंग! … चला छत्रपती शिवरायांच्या साथीने तुतारीचा नाद दाही दिशात घुमवूया’ असा नाराच या टिझरमधून देण्यात आला आहे.