LOKSABHA 2019 : शरद पवार सोमवारी नगर दौऱ्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar

सामना प्रतिनिधी । नगर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे सोमवारी (दि.25) नगर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या नेते, कार्यकर्त्यांशी तसेच औद्योगिक, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक खा. पवार यांनी प्रतिष्ठेची केली असल्याने या दौऱ्यात ते काय बोलणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी भवनमध्ये शुक्रवारी (दि.22) दुपारी पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी खा. शरद पवार यांच्या नगर दौऱ्याची माहिती दिली. खा. पवार हे सोमवारी (दि.25) सायंकाळी 5 वाजता जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेते, कार्यकर्त्यांशी तसेच औद्योगिक, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत, असे फाळके यांनी सांगितले. या बैठकीस ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, दादाभाऊ कळमकर, आ. अरुण जगताप, आ. राहुल जगताप, आ. वैभव पिचड, सीताराम गायकर, नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग, प्राजक्त तनपुरे, शिवाजी गाडे, रावसाहेब म्हस्के, सुजित झावरे, निलेश लंके, राजेंद्र कोठारी, अशोक सावंत, कपिल पवार, घनश्याम शेलार, निलेश कोते, शारदा लगड, मंजुषा गुंड, रेश्मा आठरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत नगरच्या जागेवरून झालेल्या राजकीय घडामोडींमुळे पवार-विखे कुटुंबातील जुना वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या वादामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असून या मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, पक्षाचे नेते अजित पवार हे स्वत: लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच अनुषंगाने खा. पवार यांचे नातू रोहित पवार यांनीही मागील आठवड्यात नगरमध्ये येऊन पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.तसेच खा. पवार यांनीही पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. आता ते प्रत्यक्ष नगरला येऊन संवाद साधणार आहेत.