
सामान्य माणसांच्या हाताला रोजगार देणाऱ्या संस्था सरकारने बंद पाडल्या, ही बाब भूषणावह नाही. मात्र, सत्तेचा गैरवापर करून ईडीचे खटले दाखल करणाऱ्या या भाजपच्या सत्तेला त्यांची जागा दाखवून देऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. कलम 370 आणि महाराष्ट्राचा निवडणुकीचा संबंध काय, हे कलम या अगोदरही घटनेत होतं, ते फक्त बाजूला काढण्यात आलं, त्याला आमचा विरोध नाही परंतु या कलमामुळे राज्यातील व केंद्रातील सरकार राजकारण करत असल्याची टीका शरद पवार यांनी गेवराई येथे केली. राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. माजी मंत्री शिवाजीराव पंडित, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, माजी आमदार सुनील धांडे ,सय्यद सलीम , उषा दराडे बीडचे उमेदवार संदीप क्षीरसागर आदी यावेळी उपस्थिती होते.
शरद पवार म्हणाले, पाच वर्षात विद्यमान सरकारने काय केले मुख्यमंत्री महोदय सांगतात की, आम्ही शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार कोटी रुपये दिले. 50 हजार कोटी रुपये दिले असते तर राज्यातील सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या काय, असा सवाल शरद पवार यांनी केला. या देशात गेल्या पाच वर्षात अमित शहा हे नाव कुणी ऐकलं होतं का, त्यांना कोणी बघितलं होतं का हेच अमित शहा आज सत्तेचा दुरुपयोग करून ईडीची भीती अनेक नेत्यांना दाखवत आहेत. ज्या संस्थेचा 52 वर्षात कधी संबंध आला नाही. अशा खटल्यात माझे नाव घेण्यात आले. मी ईडिचे निमंत्रण स्वीकारले, मी सांगितले मी तुमचा पाहुणचार स्वीकारायला येतोय, असं म्हणतात त्या ईडीची फिडी झाली. मुख्यमंत्री राज्यभर फिरत आहेत, परंतु महाराष्ट्राचे भवितव्य नव्या पिढीच्या हातात देत असताना कुस्ती कशी खेळायची कुस्तीच्या मैदानातून खड्यासारखे बाजूला कसे काढायचे हे आम्हला चांगले माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले गड किल्ले शौर्याचा इतिहास आहे आणि हा इतिहास पुसून टाकण्याचे काम राज्य सरकार करीत असून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे सरकार करू शकले नाहीत. इंदू मिलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकही त्यांना करता आले नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.
जेट विमान कंपनीमध्ये अडीचशे विमान आहेत, पण वीस हजार लोकांचा हातचं कामही गेले ते रोजगारापासून वंचित राहिले आहेत. आयुष्यात माझ्यावर कधी खटला झाला नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी आपण तालुक्यात विकास कामे करून तालुका ओलिताखाली आणण्यासाठी सिंचनाच्या कामाचा पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली.






























































