मावळणार्‍यांची चिंता करू नका, शरद पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेलेल्या लोकांची नावं कशाला काढता? गेलेले नेते इतिहासजमा होणार आहेत. मावळणार्‍यांची चिंता करू नका, उजाडणार्‍यांची काळजी घेऊ या. गेलेल्यांची चर्चा बंद करा आणि येणार्‍यांची काळजी, चर्चा करा. जे गेलेत त्यांना जनताच जागा दाखवेल, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

राज्यात राष्ट्रवादीला मोठय़ा प्रमाणात गळती लागली आहे. या पार्श्वभूमीवर होणारे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी खुद्द शरद पवार पक्षाला वाचविण्यासाठी बाहेर पडले आहेत. सोलापूर जिह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची बैठक हुतात्मा मंदिरात झाली. यावेळी मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. यावेळी पवारांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांवर सडकून टीका केली. तत्पूर्वी शरद पवार यांचे सोलापुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

पवार म्हणाले, माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापूर जिह्यातून झाली. 1965 साली राज्यातील तरुणांचे नेतृत्व माझ्याकडे होते. तेव्हा सोलापूर जिह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी माझ्याकडे होती. सोलापूर जिल्हा हा स्व. यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने चालणारा जिल्हा आहे. त्यामुळे या स्वाभिमानी जिह्यात लाचारी स्वीकारणाऱया नेत्यांना जागा दाखवा, असे आवाहन पवार यांनी केले.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा एकेकाळचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यातील अनेक बुरुज ढासळले असून, राष्ट्रवादीचा गड उद्ध्वस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, गेलेल्या लोकांचं नाव कशाला काढता, गेलेले नेते इतिहासजमा होणार आहेत. गेलेल्यांची चर्चा बंद करा आणि येणार्‍यांची चर्चा करा. सोडून गेलेल्यांना जनता जागा दाखवेल. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात 1957 साली काँग्रेसचा पराभव झाला होता. मात्र, सोलापुरात जिंकली होती. विधानसभेत इतर ठिकाणी काय झालं याची काळजी न करता, सोलापुरात इतिहास घडवू, असे शरद पवार यांनी सांगितले. यावेळी आपल्या भाषणात पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली.

मी काय म्हातारा झालोय; अजून लयजणांना घरी पाठवायचंय!

मी आता घराच्यांना सांगितलंय की तुम्ही आता तुमचे बघा; अनेकांना बघण्यासाठी मला बाहेर पडायचंय. मी काय म्हातारा झालोय? अजून लयजणांना घरी पाठवायचंय ते या तरुणाईच्या जोरावर, असे सांगत शरद पवार यांनी मरगळ आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. आता फक्त जिंकायचे; थांबायचे नाही, असेही पवार म्हणाले.

मेळाव्याला आजीमाजी आमदारांनी फिरवली पाठ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोलापुरातील मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे, माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंके यांनी पाठ फिरवल्याने राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यात पुन्हा झटका बसला आहे. हे तिघेही राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असून, पक्षांतराबाबत चाचपणी करीत आहेत. यापूर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे.