विद्वेष वाढवणाऱ्या प्रवृत्तींच्या हाती सत्ता देऊ नका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माणसामाणसात विद्वेष निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींच्या हाती सत्ता देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले. लोकशाही व्यवस्थेवर कुणी हल्ला करत असेल तर ते होऊ देणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात मोठय़ा उत्साहात पार पडला. यावेळी शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, उद्याच्या निवडणुकीत पुन्हा त्यांच्या हातात सत्ता आली तर चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.

लोक एकत्र करायचे. शक्ती उभी करायची आणि चुकीच्या, सांप्रदायिक जातीयवादी, माणसामाणसामध्ये विद्वेष वाढवणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांच्या हातामध्ये सत्ता जाणार नाही याची काळजी घ्यायची हे आव्हान आहे. त्या आव्हानाला सामोरे जाणे आपले सर्वांचे कर्तव्यच नाही, तर धर्म आहे, असे शरद पवार म्हणाले. त्यासाठीच समविचारी पक्षांना एकत्र करण्यासाठी राष्ट्रवादी पुढाकार घेत आहे, असे पवार म्हणाले.

कामगार, तरुण, महिला, अल्पसंख्याक, आदिवासी, दलित, भटक्या विमुक्त यांचा विचार करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अशी नोंद राज्यातील जनतेच्या अंतःकरणात झाली. ही केवळ तुमच्या कष्टामुळे करता आली, असे कौतुकोद्गारही पवार यांनी काढले. यावेळी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

3152 मुली व महिला गायब; सरकार काय करतेय?

सत्ताधारी सत्ता नाही त्या ठिकाणी राग काढण्याचा प्रकार करत आहेत. कायदा व सुव्यवस्था ठीक नसेल तर दंगली स्वरूपात त्याची किंमत मोजावी लागते. लहान घटकांना संरक्षण द्यायचे असते, परंतु आज महिलांची काय परिस्थिती आहे? 23 जानेवारी ते 23 मे 2023पर्यंत 3152 मुली व महिला गायब आहेत. भगिनींचे संरक्षण करण्यासाठी सरकार काय करतेय, असा संतप्त सवालही शरद पवार यांनी केला.