एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असतानाच राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असून उद्धव ठाकरे यांना अखेरपर्यंत साथ देणार असल्याचे आज स्पष्ट केले.
विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार आज राजधानीत आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील सद्य स्थितीवर भाष्य केले.
अखेरपर्यंत सरकारसोबत
आमचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्यांच्या पाठीशी घटक पक्ष म्हणून आम्ही शेवटपर्यंत राहू, असे पवारांनी या वेळी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे आणि त्यांना समर्थन देणारे आमदार अडीच वर्षे या सरकारमध्ये आहेत. अडीच वर्षांत त्यांना काही समस्या वाटली नाही, आताच अडचणींचा पाढा का वाचला जात आहे, असा सवालही पवारांनी या वेळी उपस्थित केला.
बहुमत आहे तर मग मुंबईत का येत नाहीत
एकनाथ शिंदे हे बहुमताचा दावा करत आहेत. तशी वस्तुस्थिती असेल तर मग ते मुंबईत का येत नाहीत. गुवाहाटीतच का ठाण मांडून बसले आहेत, असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला.
कोणाच्याही गाठीभेटी नाहीत
मी फक्त राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी दिल्लीत आलो आहे. कोणाच्याही राजकीय गाठीभेटी घेणार नाही, असेही शरद पवार यांनी एका उत्तरादाखल स्पष्ट केले.
शिवसैनिकांचे कौतुक
मी जितका शिवसेनेला ओळखतो त्यानुसार सध्या शिवसेनेबाबत जे चालले आहे ते शिवसैनिक कधीच खपवून घेणार नाहीत. शिवसैनिकांत प्रचंड शक्ती, संघटन आणि संघटनेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असते. कष्ट करण्याची वृत्ती असते. त्यामुळेच बंडखोर आमदारांनी काहीही भूमिका घेतली असली तरी शिवसेनेवर त्याचा परिणाम होणार नाही, अशा शब्दांत पवारांनी शिवसैनिकांचे कौतुक केले.
आज बाळासाहेब नाहीत, आधार देणे हे माझे कर्तव्य
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. ते असते तर सगळं आलबेल झालं असतं. आज त्यांच्या मुलावर संकट कोसळलं आहे. अशा वेळी उद्धव ठाकरे यांना आधार देणं हे माझं कर्तव्य आहे, असेही शरद पवार यांनी या वेळी नमूद केले.




























































