
सामना ऑनलाईन । नगर
स्वातंत्र्यानंतर अनेक पंतप्रधान आले, मात्र आजपर्यंत विरोधकांना संकटात आणण्यासाठी व नामशेष करण्यासाठी कोणत्याही सरकारने सत्तेचा इतका गैरवापर केला नाही जितका हे सरकार करत आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना केला. तसेच यावेळी त्यांनी विरोधक एकत्र येऊन देशाला एक सक्षम पर्याय देणार आहोत असे देखील यावेळी सांगितले. एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार नगरमध्ये आले होते. यावेळी पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे व पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, ‘विमान खरेदी प्रकरणांमध्ये जो गैरवापर झाला त्यासंदर्भात परदेशातील एजंटकडून माहिती घेतली जात आहे. आम्ही ती लवकरच जाहीर करणार आहोत. देशात ज्या महत्त्वाच्या स्वायत्त संस्था आहेत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रकार सत्तेच्या माध्यमातून केला जातो आहे. आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर आपण असे हल्ले फक्त याच सरकारच्या काळामध्ये बघितले आहे. न्यायव्यवस्थेला पत्रकार परिषद घ्यावी लागते, रिझर्व्ह बँकेला गव्हर्नरला दिलेले आदेश न पाळल्यामुळे त्यांना हाकलून द्यावे लागले, सीबीआयमध्ये सुद्धा हस्तक्षेप करण्यात आला व तेथे असे प्रकार घडले आहेत. हा विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न सुरू असून एक प्रकारे आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. देशामध्ये पुन्हा सत्ता मिळेल की नाही याबाबत त्यांना खात्री नाही म्हणून ते आता सत्तेचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करीत आहे
गेल्या आठ दिवसांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. पण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला लॉलीपॉप म्हणतात. हे चुकीचे आहे. त्या राज्यात सरकारने हा निर्णय घेतला त्याला मदत करण्याऐवजी ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात. हे योग्य नाही, असा घणाघाती आरोपही शरद पवार यांनी केला आहे.

























































