शरद पवार यांच्यावर 8 ते 10 दिवसात आणखी एक शस्त्रक्रिया होणार – राजेश टोपे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीची देखभाल करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी दिली. तसेच येत्या आठ ते दहा दिवसात त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

बुधवारी दुपारच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली. शरद पवार यांच्यावर काल यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या पित्ताशय नलिकेत खडे आढळल्यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र, एन्डोस्कोपीद्वारे हे खडे काढण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. तसेच त्यांचा पोटदुखीचा त्रासही थांबला आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवारांचा गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. गॉल ब्लॅडर काढल्याने त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीवर काहीही परिणाम होणार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितले. पोटदुखीचा त्रास वारंवार होऊ नये म्हणून डॉक्टरांनी हा निर्णय घेतला. येत्या 8 ते 10 दिवसांत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून गॉल ब्लॅडर काढण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा अॅडमिट करण्यात येणार आहे. मात्र, त्यांची प्रकृती आणखी उत्तम वाटली तर लगेच चार-पाच दिवसातही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, असेही राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा

राज्यात लॉकडाऊनचा कोणताही निर्णय झालेला नाही, मात्र गर्दी टाळण्यासाठी काही कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे. अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल, असेही राजेश टोपे यांनी यांनी स्पष्ट केले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी वेळोवेळी सरकारकडून उपाययोजना केल्या जातात. पण लोक जर बेफिकीरीने वागणार असतील तर सरकारला नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

लसीकरणाला वेग, रुग्णसंख्या नक्कीच कमी होईल

राज्यात कोरोनाचे बेड्स सर्वत्र उपलब्ध आहेत. काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्यानंतर बेड्स वाढविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच ऑक्सिजनचा वापर 80 टक्के आरोग्यासाठी व 20 टक्के उद्योगासाठी करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही राजेश टोपे म्हणाले. तसेच लसीकरणातही राज्यात वेग आणला असून सार्वत्रिक प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे, येत्या काही दिवसांत रुग्णसंख्या नक्कीच कमी होईल, असा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.