Share Market Crash- ७ लाख कोटी स्वाहा! ट्रम्प यांच्या धमकीमुळे शेअर बाजारात हाहाकार, सेन्सेक्स १,००० अंकांनी घसरला, रुपया ऐतिहासिक निचांकी पातळीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखातात तणाव वाढल्याने आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे आज देशार्गत शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई (BSE) निर्देशांक १,००० पेक्षा जास्त अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी ३०० पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. याच दरम्यान रुपया देखील डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर गेला आहे. सकाळी ९:५० वाजता निर्देशांक १,०१०.६४ अंकांच्या म्हणजेच १.३४% घसरणीसह ७४,२२७.३५ अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टी ३०३.२५ अंकांच्या म्हणजेच १.२८% घसरणीसह २३,३४०.२५ अंकांवर आला होता. या घसरणीमुळे बीएसईवर नोंदणीकृत कंपन्यांचे मार्केट कॅप ७ लाख कोटी रुपयांनी घटून ४५४ लाख कोटी रुपयांवर आले.

सुरुवातीच्या व्यवहारात निर्देशांकामधील ३० पैकी २७ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. पॉवरग्रिडच्या शेअरमध्ये सर्वाधिक ३.८१ टक्क्यांची घसरण झाली आहे. यासोबतच टाटा स्टील, मारुति, टायटन, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, बजाज फिन्सर्व्ह आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. दुसरीकडे, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि टीसीएस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

कोणते शेअर्स घसरले?

निफ्टीमध्ये पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, टाटा स्टील आणि टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. हिंदुस्थानसोबतच आशियाई बाजारपेठांमध्येही घसरण पाहायला मिळाली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, इराणकडे असलेला वेळ खूप वेगाने निघून चालला आहे आणि त्यांनी लवकरच कोणताही निर्णय घेतला नाही, तर त्यांच्यासाठी काहीही शिल्लक राहणार नाही. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड सध्या १.८४ टक्क्यांसह १११.३ डॉलर प्रति बॅरलवर ट्रेड करत आहे.

रुपया ऐतिहासिक निचांकी पातळीवर

या दरम्यान रुपया पुन्हा एकदा डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर गेला आहे. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीमुळे रुपया घसरला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात रुपया ०.२ टक्क्यांच्या घसरणीसह ९६.१८ पर्यंत खाली गेला. यापूर्वीचा याचा ऐतिहासिक निचांक ९६.१३५० होता. रुपयामध्ये सलग पाचव्या सत्रात घसरण झाली आहे. गंभीर बाब म्हणजे या वर्षात रुपया हे चलन सर्वात वाईट कामगिरी करणारे आशियाई चलन ठरले आहे. २८ फेब्रुवारी रोजी इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर रुपया डॉलरच्या तुलनेत ५.५ टक्क्यांनी घसरला आहे.