
‘बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात’ अशी म्हण प्रचलित आहे. ही म्हण अलिबाग तालुक्यातील लोणारे गावची शर्विका म्हात्रे हिने सत्यात उतरवली आहे. शर्विकाची हिंदुस्थानातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. या कामगिरीनंतर रायगडावर जाऊन शर्विकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हे यश समर्पित केले आहे.
शर्विकाच्या कामगिरीमुळे सर्व स्तरातून तिचे आणि तिच्या पालकांचे कौतुक केले जात आहे. शर्विकाला मिळालेला हा सन्मान किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण केला आहे. यावेळी शर्विका हिने किल्ले रायगड पायी चढून सर केला.
जितेन म्हात्रे यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी कार्यालयाकडे शर्विकाचे गड किल्यावर पायी चढतानाचे व्हिडीओ आणि कागदपत्रे पाठवली होती. ती तपासल्यानंतर शर्विकाची हिंदुस्थानातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. इंडिया रेकॉर्ड ऑफ बुककडून शर्विका हिला मेडल, प्रमाणपत्र, बुक देण्यात आले आहे.
गड किल्ले पाहण्यासाठी अनेक पर्यटक, शिवभक्त जात असतात. मात्र पायी गड किल्ले सर करताना अनेकांची दमछाक होत असते. शर्विका ही दीड वर्षांची असल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले पायी चालत जाऊन सर करीत आहे. शर्विकाचे वडील जितेन म्हात्रे आणि आई अमृता म्हात्रे यांना हे देखील पहिल्यापासून गड किल्यावर जातात. मावळा प्रतिष्ठानमध्ये दोघेही सहभागी होऊन गड किल्याच्या संवर्धनाचे काम करीत आहेत. शर्विकालाही लहानपणापासूनच गड किल्याचे आकर्षण असून सुट्टीत ती समुद्र वा इतर ठिकाणी न जाता गड किल्यावर जाण्याचा हट्ट करीत असते, असे तिची आई अमृता म्हात्रे यांनी सांगितले. विशेष म्हणजे गड, किल्यावर स्वच्छता मोहिमेतही शर्विका स्वतःहून भाग घेत असते.
शर्विकाने आतापर्यंत 11 किल्ले हे पायी चढून सर केले आहेत. 26 जानेवारी रोजी प्रबळगड किल्ल्यावरील चढण्यास कठीण असलेला कलावंतीण किल्ला पायी चढून झेंडा फडकवला होता. शर्विकाला सर्व किल्ल्यांची नावे पाठ असून छत्रपती शिवाजी महाराज यांची गारदही पाठ आहे. भविष्यात तिला चांगली गिर्यारोहक बनविण्याचा मानस असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.





























































