
>> डॉ. शशिकान्त लोखंडे
कवी डॉ. सुधीर राजाराम देवरे यांचा ‘डंख व्यालेलं अवकाश’ हा कवितांचा संग्रह 1999 साली साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केला. आता 22 वर्षांनी या संग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि स्वागत.
मानवी जीवनाच्या शैलीत आणि व्यवस्थेत अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. मानवी मूल्य, मानवी श्रद्धा आज ढासळलेल्या दिसतात. अशा अवस्थेत डॉ. देवरे यांचे व्यक्तिमन अंतर्मुख बनले आहे. त्यांना दिसते ते सभोवार काळवंडून गेलेले मानवी जीवन. म्हणून डंख अनुभवीत मानवी अस्तित्वाचा अर्थ ते शोधू लागले. अंतर्मन व बहिर्मन, बाह्यवास्तव आणि अंतर्मन यांच्यातील द्वंद्व, विसंगती, ताण ते व्यक्त करू लागले. म्हणून व्यथा व्यालेली त्यांची कविता अतिवास्तवाचा प्रदेश व्यापून जाते.
“हे सारं सोसता सोसता
निघालाच उत्स्फूर्त ‘चित्कार’ तर तो
अलगद टिपून घ्यावा ओठांनी
आणि उमटू द्यावा प्रशांत कागदावर’’
अशी ही चित्काराची कविता मनावर उमटून जाते. असा दुःखभाव या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. कवितेची समीक्षा म्हणजे काव्यगत अर्थांचे उलगडणे नव्हे तर तिच्या निमित्ताने प्रसवणाऱया प्रवासाचे दर्शन घडवणे असते. जे कवितेत आहे, पद्यात्म असणारे रूप ते गद्यात चिरफाडणे म्हणजे कविता अनुभवणे नाही, हे लक्षात घेतल्यावर कवितेतील सर्वस्तरीय उपरोध, विडंबन, असंगतता, विरचना आणि परात्मता एकात्मतेने रसिकांना जाणवतात. सवयीमुळे वा अतिपरिचयामुळे आपले संवेदन यांत्रिक बनते. या यांत्रिकीकरणाला, परिचितीकरणाला आव्हान देणे वा छेद देणे हे कवितेचे कार्य आहे.
अनुभवाची अनुभव म्हणून जाणीव व्हावी, अनुभवाचे अनुभवत्व जाणवावे, त्याच्याकडे नव्या दृष्टीने हे अपरिचितीकरण आहे. यातील बोधन सौंदर्यपूर्ण आहे. म्हणून ‘अभिव्यक्ती’, ‘नवा जन्म’, ‘संजीवनी’, ‘स्मारक’, ‘आगपेटी’, ‘पोरगं’, ‘बातमीदार’, ‘स्वप्न’, ‘वस्ती’, ‘आग’, ‘कवी’, ‘अंतराचं ओझं’, ‘नास्तिक’, ‘प्रमाणपत्र’, ‘शिरावर टांगती तलवार’ या कविता पाहता येतील.
परिचित अनुभूतीला नाव न देऊन तिला या कवितेत अपरिचित्व येते. त्या अनुभूतीने जणू काही आपण पहिल्यांदाच पाहत आहोत अशा प्रकारचे वर्णन या संग्रहातील काही कवितांमध्ये आहे (उदाहरणार्थ – ‘अनाकलनीय तू’, ‘मृत समुद्र’, ‘मी माझ्या चितेत’ इत्यादी). तार्कीकतेच्या पलीकडील अधिक काही देणे कवीने साधले आहे. येथे कवित्वाच्या सत्वाची जाणीव दुहेरी आहे. स्वतःचे इतरांशी असलेले सारखेपण आणि इतरांहून असलेले वेगळेपण चित्रित झाले आहे. त्यामुळे वाक् आविष्कार, आत्मकेंद्री, उत्कट, व्यक्तिवादी भावानुभावांची प्रचीती देणाऱया काही कविता समाजमूल्य – ऱहास दर्शनाच्या असूनही सामाजिक ढोबळ बंडखोरीच्या होत नाहीत. मनाबाहेरील, घराबाहेरील घडणाऱया घटीतांमधील विसंवादाने कवी डंखीत झाला आहे. कौटुंबिक ऱहासापासून राजकीय ऱहासापर्यंतचा अवकाश त्याला ‘वेदना’ देतो. तरीही केवळ विचार दर्शन हा या अभिव्यक्तीचा हेतू नाही. दोन परस्पर विरोधी कल्पनांचा, मूल्यांचा संघर्ष कवितेत आहे. जीवनाबद्दलची वृत्ती त्यातून प्रकट केली जाते. तरीही कविता शब्दांद्वारे केवळ विचार व्यक्त करत नाहीत. दृष्य प्रतिमांच्या माध्यमातून कटू वास्तवाची असहाय्यता, यांत्रिक जगणं, मानवी संवादाचे हरवलेपण, संवेदनांची बोथटता, चित्कारांची वेदना, वास्तवातील वंचना – दुःख, चौकट बंदिस्त जीवन, जीवननिष्ठ विसंवाद, निरर्थकता, जाणीव भावसंबंधातील भावनिक दरी, तुटलेपण, स्त्रियांवरील अन्याय, राजकीय कोसळवणूक, समकालीन वास्तवाची कुरुपता, माणसाचं एकाकीपण, यांत्रिकता, प्रेमभावातील थंडपणा या साऱयांचे दर्शन ‘डंख व्यालेलं अवकाश’मध्ये आहे.
पुष्कळशा कविता विरोधाभास – न्यास (Paradoxial) करीत, Cliches टाळत साकार होतात. रचनातंत्र, क्लृप्ती, करामत आणि कल्पनाबंध (Motif) यांचा कॅलिडोस्कोप आहे. कवितेची शब्दात्म व अर्थात्मक अंगे, प्रतिमा, प्रतीके, रुपके, उपमा यातून शब्द, वाक्य अर्थ स्थरावर विचलन स्वीकारतात (उदाहरणार्थ – ‘पत्र’ ‘दोऱया’, ‘रेडिओ दुखवटा पाळतो’, ‘आग’, ‘शब्दशरांना सामोरी’, ‘फुलपाखरू’, ‘कवी’, ‘कवी आणि बायको’, ‘पूल’, ‘नास्तिक’, ‘अभिव्यक्ती सावधान’, ‘लोक काय म्हणतील’, ‘तुमचा मान मोठा’ इत्यादी).
डॉ. सुधीर देवरे यांची कविता आंतरिक डंख, विलक्षण बाह्य घटना, व्यक्तिनिष्ठ विसंगती, विचार यामधून जन्म घेते. ही कविता अंतर्मनातून, जीवन चिंतनातून, मनोसंघर्षातून, डंख व्यालेल्या अवकाशातूनच फक्त येत नाही तर तिला प्रेरक करायला प्रक्षोभक असे मनाबाहेरही काही घडावे लागत असावे. त्यातून कवीमन सजग होते, थरारून जाते व मग त्यातून त्यांची कविता जन्म घेत असावी. म्हणून त्यांचे भावानुभवाचे विश्व मर्यादित राहात नाही. जे भावानुभव व्यक्त होतात त्यात प्रभावाने सूक्ष्मता दिसते. त्यांच्या कक्षा-अवकाश निश्चित आहेत. भावानुभवाचे वा विचारानुभवाचे तार्किक विश्लेषण रूक्ष नसते. मोजक्या शब्दांचे तिरकस उपयोजन करून तरळ भावस्थितीचे चित्रण या संग्रहात आधिक्याने येते. त्याला Personification चा स्तर लाभतो. कवीची अनुभूती स्वतःची तात्त्वीक असल्याने जीवन व्यवहारातील मूल्य – ऱहासाबरोबर सत्याचा शोध घेते. त्यामुळे विचारगर्भ जीवनाची जाणीव ‘व्यालेली’ दिसते ती ‘डंख’ जाणीव म्हणूनच. त्यामुळे ही कविता जेवढी वाचनीय तेवढीच मननीय आहे.
या दुसऱया आवृत्तीत याच प्रेरणेच्या समांतर असलेल्या काही कविता नव्याने समाविष्ट केल्या आहेत. त्या कवितांमधून डॉ. देवरे यांचे अनुभवक्षेत्र विस्तारून, त्यांची कक्षाही विशाल झालेली दिसून येते.



























































