त्या लोकांमध्ये आनंद वाटतात… 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

 डॉ. विजया वाड… अनेक बिरुदं मिरवीत विजूताई आपल्यातलं सायीचं आईपण जपतात… त्यामुळे त्याचे घर त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपलेसे वाटते…

लेखनाची कला माझ्या आईमुळे जोपासली गेली माझ्यात. बारा वर्षांची होते मी…नाक नकटं होतं माझं. त्याचं खूप वाईट वाटायचं… माझी ताई म्हणायची, ‘नाक ओढ म्हणजे होईल लांब…’ मी बसायचे नाक ओढत… तेव्हा आई म्हणाली, ‘जे नाही त्याचा विचार करशील तर आयुष्यभर दुःखी होशील… जे आहे ते जोपास… निबंध छान असतात ना तुझे… वर्गावर्गात वाचून दाखवले जातात ना ते… मग लिही भरपूर…लोकांना दिलासा देणारं लिहिशील तर ते सुखावतील आणि तू सुखी होशील.’ मग मी लिहित गेले.

विजयाताई आणि त्यांचे यजमान विजयराव, सध्या जिथे राहतात ते पवईचं घर, हे त्या दोघांसाठी कमी आणि पुस्तकं, पुरस्कारांसाठी जास्त आहे, असं मला वाटलं. कारण हॉलमध्ये त्यांच्या डेस्कपाशी खुर्ची घेऊन बसलेल्या विजयाताईंपर्यंत पोहोचताना, मला पुस्तकं आणि पुरस्कारांमधून वाट काढत जावं लागलं… ‘विजयरावांना १९६५ च्या लढाईनंतर जे रक्षा मेडल मिळालं होतं, त्याचं मानाचं पान म्हणून मनोहरपंतांनी दिलं आहे हे घर…’ विजयाताई किती अभिमानाने सांगत होत्या हे…

update

त्या मूळच्या नाशिकच्या.. विजया दातीर.. मुंबई आग्रा रोडवर आनंदी भुवनमध्ये जन्म झाला त्यांचा.. आजीचं नाव आनंदी.. ‘मी माझ्या आई-बाबांचं पाचवं अपत्य.. दोन भाऊ, दोन बहिणी आणि अपघातानं झालेली मी…’ विजयाताई हसत हसत म्हणाल्या…‘मोठा भाऊ १३ वर्षांनी मोठा माझ्यापेक्षा.. नाशिकच्या आनंद भुवननंतर पुण्याला रेव्हेन्यू कॉलनीत आलो आम्ही राहायला.. वडील सिटी मॅजिस्ट्रेट होते.. १९५६ मध्ये गेले ते… आणि मग दादाच माझा बाबा झाला… मी फक्त अकरा वर्षांची होते तेव्हा…’ मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकले… बाबा गेले आणि राहती मोठी जागा, गाडी सगळंच गेलं.. घर चालवायचं म्हणून मोठे दोन्ही भाऊ कामाला लागले… मोठा भाऊ जेलर झाला, क्वार्टर्स मिळतात म्हणून… येरवडय़ाला राहायला गेलो मग आम्ही… भाऊ आणि माझ्यामध्ये आधार शोधला आईनं… अठराव्या आणि विसाव्या वर्षी दोन्ही बहिणींनी लग्न केलं, भावांवर बोजा नको म्हणून. मी एसएससीपर्यंत पुण्यातच होते… मग मुंबईला आले दुसऱया भावाकडे… तो म्युनिसिपालटीत कामाला होता. सोमय्यातून बीएस्सी केलं मी. सुट्टीत नाशिकला जायचे बहिणीकडे सावरकर वाडय़ात… माझ्या सगळ्या सुट्टय़ा आक्काच्या नाशिकच्या घराशी निगडित आहेत… मोठय़ा मुलीच्या प्राजक्ताच्या वेळी नाशिकलाच होते. प्राजक्ता आणि निशिगंधा या दोन्ही मुलींबद्दल सांगताना विजयाताई सहज म्हणून गेल्या, ‘प्राजक्तासारखं माझं आयुष्य बहरलं आणि निशिगंधासारखं दरवळलं.. माझ्या दोन्ही मुली, विठु रखुमाईसारखं आम्हाला सांभाळतात.. दोघी आम्हाला पेन्शन देतात..’

‘दादाची पुण्याहून ठाणा जेलला बदली झाली आणि मी दादाकडे राहायला गेले.. काटकसरीनं राहायचो आम्ही.. १९२ रुपये पगार होता त्याला.. मला दोन रुपये पॉकेटमनी मिळायचा… स्वस्ताई होती तेव्हा आणि कष्टाचं काही वाटायचंच नाही…’ विजयाताईंच्या साखर पेरलेल्या आवाजात आजवर मी त्यांची अनेक भाषणं, गोष्टी ऐकल्या होत्या, पण त्यांचीच गोष्ट त्यांच्या गोष्टीवेल्हाळ शैलीतून ऐकण्याचा हा अनुभव, त्या सगळ्यांपेक्षा वरचढ होता.. टेबल टेनिस आणि चेसची युनिव्हर्सिटी प्लेयर होते मी तेव्हा.. चेसमध्ये तर चॅम्पियन होते..त्या खेळण्याच्या नादात पहिला वर्ग मात्र गेला माझा बीएस्सीला.. नंतर लगेचच लग्न झालं माझं.. पण आईनं कबूल करून घेतलं होतं सासरच्यांकडून, की ते पुढे शिकवतील मला म्हणून… अगदी चहा-पोहे खाऊन, दाखवण्याचा वगैरे कार्यक्रम करून लग्न झालं माझं.. रक्षा मेडल मिळालेला शूर सैनिक मला आवडला नवरा म्हणून.. पण लग्नानंतर लगेचच ते पोस्टिंगवर गेले आणि मग मला रोज खूप रडायला यायला लागलं.. सासू-सासरे प्रेमळ होते, पण नवरा नव्हता नं जवळ.. आणि त्यांना मला त्यांच्याबरोबर नेता येत नव्हतं… ‘हळूहळू रमतं गं मन सासरी’ आतेबहीण कुसुमताई तेव्हा माझी मग समजूत काढायची…’’

विजयाताई मला त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगत होत्या.. आलू पराठा खाऊन झाला होता माझा आणि आंब्याच्या फोडी माझी वाट पाहत होत्या ..तेवढय़ात विजयराव चॉकलेट घेऊन बाहेर आले आणि मला देत म्हणाले, ‘हा माझ्याकडून छोटासा खाऊ.. बघा तुम्हाला आवडतो का ते.’ मानमरातब, प्रसिद्धी, यश यांची शिखरं पार केलेली माणसं, आपल्या स्थानाचा विचार न करता, सहजतेनं समोरच्याला कसं आपलंसं करून घेतात, याचं हे उदाहरण.. नंतर फोटो काढायला आलेल्या रूपेशलाही माझ्याइतकाच खाण्याचा आग्रह त्यांनी केला…’ या घर आपलंच आहे,’ अशी पाटी नसली तरी घरी आलेल्या प्रत्येकाला ते घर आपलं वाटलं पाहिजे, हे त्या दोघांच्याही वागण्यातून जाणवत होतं.. ‘तुला लिहायला सोपं जाईल, इथे बस.’ असं म्हणत, विजयाताईंनी स्वतःची नेहमीची लिहिण्याची जागा माझ्यासाठी रिकामी करून दिली, तेव्हा तर मी हरखूनच गेले.. त्यांच्या जागेवर बसून लिहिताना, प्रत्यक्ष सरस्वतीच्या मांडीवर बसून अक्षर पाटी गिरवत असल्यासारखा आनंद मला होत होता.. ’ सासूबाईंमुळे शिकले मी.. दोन मुली झाल्यावर मी बीएड केलं.. कॉलेजात पहिली आले.. विद्यापीठात मानांकन मिळालं.. देशात फक्त दोन टक्के मुलांना मिळते ती टाटा मेमोरिअल स्कॉलरशिप मिळाली.. माझ्या शिक्षणाचं खूप कौतुक होतं घरात..

सतत माणसांमध्ये राहून माणसं वाचण्याचा, विद्यार्थ्यांना जाणण्याचा आणि त्यांच्या भावविश्वाला आपल्या लेखनातून साकार करण्याचा विजयाताईंचा .स्वभाव.. ‘बाई होऊ नकोस विद्यार्थ्यांची, आई हो..’ हे त्यांना त्यांच्या आईनं सांगितलं होतं आणि तिचा शब्द त्या अक्षरशः जगल्या.. म्हणूनच त्यांच्या लेखणीला शब्दांची आणि अनुभवांची कमतरता कधीच भासली नाही..शब्द त्यांचा श्वास आहे..कथुली हा त्यांचा लेखनप्रकार, वाचनापासून दूर जाणाऱया आजच्या तरुण वर्गालाही आकर्षित करतो.. चटकन संपणाऱया पण पटकन हृदयाला भिडणाऱया या कथुल्या.. त्यांच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर, वाचकांनी त्यांना लिहिलेलं एखादं उत्तम पत्र त्या छापतात.. त्यामुळे वाचकांशी जुळलेलं नातं, दृढ होतं.. माणसं जोडण्याची ही मनोवृत्ती खरंच अनुकरणीय आहे.

विश्वकोशाच्या वेळी जेव्हा जेव्हा विरोधी सूर उमटला, तेव्हा तेव्हा हे वाचकच म्हणायचे, आम्ही पाठीशी आहोत तुमच्या.. निशिगंधा आणि बाबासुद्धा तेव्हा पहाडासारखे उभे राहिले पाठीशी.. कारण त्यांना माझी ताकद माहिती होती… मुळात विश्वकोशाची जबाबदारी त्यांच्याकडे आली कशी याबाबतीत मला जाणून घ्यायचंच होतं.. पोदारमध्ये मराठी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य होत्या त्या.. ‘अनुसूया पालवी’ नावाच्या आदिवासी मुलीला त्यांनी अक्काकडून शिकवायला आणलं होतं स्वतःकडे.. ती इंग्रजी आणि गणितात नापास व्हायची सतत दहावीला.. त्या वेळी त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांना पत्र लिहिलं की १९६१ मध्ये जर इंग्रजी आणि गणित सोडून एसएससी करता यायचं, तर मग आता का येत नाही? आदिवासी मुलींना गणित आणि इंग्रजी आलंच पाहिजे हा अट्टहास ठेवताना, त्या दहावीत नापास होत आहेत, याचाही विचार व्हायला हवा ना… २००४ मध्ये भाषाशुद्धीचे ही प्रयोग त्या करत होत्या.. शाळा सुटल्यावर रोज वीस मिनिटं त्या भाषाशुद्धीचा तास घ्यायच्या. ‘माणसं भेटतात, पुस्तक मिळतं, ते भेटत नाही..’ असा भाषेच्या मुळाशी जाऊन शिकवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला, ज्याबद्दल वर्तमानपत्रात छापून यायला लागलं आणि मग मुख्यमंत्र्यांच्या पीए साहेबांचा त्यांना फोन आला.. ‘भेटून जा दहा मिनिटं’ असा.. मराठी विश्वकोशाचं पद, श्रीकांत जिचकरांनंतर विलासरावांनी त्यांना देऊ केलं.. विजयाताईंनी विचार करून नंतरच ते स्वीकारलं..

एका बालसाहित्यिकेला विश्वकोशाचं काम? असा प्रश्न, खूप बुद्धिमान असणाऱया लोकांना पडला त्या वेळी.. मला वाटत होतं, की मला परीक्षेला बसू तर द्या.. परीक्षेला बसूच द्यायचं नाही, हा हट्ट का? सगळ्या आक्षेपांना उत्तर, मी माझ्या कामातून दिलं..

मतभेद होतात, घरात, घराबाहेर सुद्धा.. पण ‘रात गयी बात गयी’ या विचारानं विजयाताई नवा दिवस जगतात.. असं जगलं की स्ट्रेस कमी होतो, हे त्यांचं प्रामाणिक मत.. विजयाताईंशी बोलताना सारखं वाटत होतं, या एका व्यक्तीत अनेक व्यक्तींचा वास आहे की काय. हो, नाहीतर एवढं काम एकच व्यक्ती करूच कशी शकेल? २४ जूनला विश्वकोशाचं काम संपल्यावर, २५ जूनला त्यांनी बालकोशाचं काम सुरूसुद्धा केलं. प्रत्येक घटनेला, व्यक्तीला, क्षणाला होकारच दिला की आयुष्यही सारे होकारच घेऊन सामोरं येतं, हे म्हणणं पुस्तकी आदर्श म्हणून उत्तम वाटत असलं, तरी प्रत्यक्षात ते किती महाकठीण आहे, हे आपण जाणतोच.. त्यातून ओठांवर मध आणि डोक्यावर बर्फ ठेवून, शांतपणे गोड बोलत, ध्येयाचा पाठपुरावा करत राहणं अशक्यच वाटतं आपल्या सगळ्यांनाच.. पण आता मी हे नक्की सांगू शकेन, की अशक्य वाटणारी जगातील सात आश्चर्य फक्त वास्तूंच्या रूपातच नाहीत तर माणसांच्याही रूपात अस्तित्वात आहेत आणि त्यातलं एक आश्चर्य, म्हणजे विजयाताई वाड!