सावत्र आई मारते म्हणून घरातून पळाली, धारावी पोलिसांनी तिला शोधून काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सावत्र आई मारते म्हणून 14 वर्षांची मुलगी रागाच्या भरातच घराबाहेर पडली. तिने कोणाला काही न सांगता थेट पटण्याला जाणारी एक्स्प्रेस पकडली. रेल्वेने ती सुसाट गावाकडे निघाली होती, पण धारावी पोलिसांनीदेखील वेळीच तपास चक्र फिरवत रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्या मुलीला सुखरूप ताब्यात घेतले.

पिंकी (नाव बदलेले) असे त्या मुलीचे नाव असून ती धारावीत वडील व सावत्र आईसोबत राहते. सावत्र आई मारते म्हणून पिंकी बुधवारी सकाळी घराबाहेर पडली. रागाच्या भरात तिने कुर्ला टर्मिनस गाठले आणि पटणा एक्स्प्रेस पकडून गावाकडे निघाली. दरम्यान, बराच वेळ झाला तरी पिंकीचा काही थांगपत्ता न लागल्याने तिच्या आईने धारावी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. याची तत्काळ गंभीर दखल घेत वरिष्ठ निरीक्षक राजू बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पिंकीचा शोध घेऊ लागले.

पिंकीकडे मोबाईल नव्हता किंवा तिने कोणाला काही सांगितले नव्हते. मात्र पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून पिंकीने एका सहप्रवाशाच्या मोबाईलवरून तिच्या एका मित्राला फोन केल्याचे शोधून काढले. मग त्या मित्राकडून त्याला आलेला मोबाईल क्रमांक मिळवला आणि पिंकी कुठे आहे ते स्पष्ट झाले. ती पाटणा एक्स्प्रेसने प्रवास करीत असून ट्रेन भुसावळ स्थानकापुढे गेल्याचे समजताच धारावी पोलिसांनी जीआरपीला संपर्क साधून पिंकीला रावेर स्थानकात ताब्यात घेतले. अल्पवयीन पिंकी एकटीच रेल्वेने प्रवास करीत होती. दुर्दैवाने ती रस्ता भटकून समाजपंटकांच्या हाती लागली असती तर अनर्थ घडला असता, पण धारावी पोलिसांनी वेळीच तपास चक्र फिरवून तिला सुखरूप ताब्यात घेण्याचे काम फत्ते केले.

बेपत्ता झालेल्या 35 मुलींची घरवापसी

धारावीत राहणाऱया 35 अल्पवयीन मुली वर्षभरात बेपत्ता झाल्या होत्या. त्या कुठे गेल्या त्याचा काही थांगपत्ता नव्हता. मात्र वरिष्ठ निरीक्षक राजू बिडकर व त्यांच्या सहकाऱयांनी कुठलीही हार न मानता अविरत शोधमोहीम राबवून त्या सर्व बेपत्ता झालेल्या 35 अल्पवयीन मुलींची सुखरूप घरवापसी केली.