
नगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस पडत असून, शेवगाव तालुक्यात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. नगर शहरातही दुपारनंतर झालेल्या पावसाने सर्वत्र पाणी साचले होते. तसेच अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
हवामान खात्याने येत्या पाच दिवसांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला होता. पाथर्डी, शेवगाव तालुक्यांतील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते. मागच्या आठवडय़ात शेवगाव, पाथर्डी तालुक्यांमध्ये पावसाने मोठे नुकसान केलेले आहे. नगर शहरातील केडगाव, भिंगार, एमआयडीसी परिसरात पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दोन ठिकाणी घरांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शेवगाव तालुक्यातील कांबी येथे रात्री झालेल्या पावसामुळे शेजारच्या नदीला पूर आला आहे. या पुरामुळे गावातील हनुमान मंदिर, ग्रामपंचायत गाळ्यांसह अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. पावसाचे पाणी अचानक आल्याने कांबी येथील 25 कुटुंबे, तर म्हस्केवस्तीवरील काही कुटुंबे पाण्यामध्ये अडकली आहेत. सुमित पांचारिया यांची जनावरे वाहून गेली.
31 ऑगस्टला तालुक्यातील आखेगाव, भगूर, वडुले परिसरात पुराने हाहाकार माजविला होता. त्याचीच पुनरावृत्ती रात्री कांबी गावात घडली असून, अनेक जनावरे वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. 31 ऑगस्ट रोजी झालेल्या शेवगाव-पाथर्डी डोंगरमाथ्यावर झालेल्या ढगफुटीने अनेक ओढय़ा-नाल्यांबरोबर नांदणी- चांदणी नद्यांना मोठा पूर येऊन अनेक गावांत पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. त्यातच शनिवारी रात्री झालेल्या कमी-अधिक तशाच पावसाने नांदणी- चांदणी नद्यांना दुसऱयांदा पूर आला आहे.


























































