शेवगावातील रेणुकामाता मंदिरातील चोरी उघडकीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेवगाव तालुक्यातील रेणुकामाता मंदिरात 18 ऑगस्टला चोरी झाली होती. यामध्ये देवीचे सोन्याचे 16 लाखांचे दागिने चोरीला गेले होते. या घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात शेवगाव पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरटय़ांकडून तब्बल 22 गुन्हे उघडकीस आले आहेत.

गणपत कुंडलिक केदार (वय 46, रा. हातराळ, ता. पाथर्डी), अजय छबू चव्हाण (वय 27), जॅकसन उर्फ किशोर पुंजाराम जाधव (वय 34, दोन्ही रा. माळीबाभूळगाव, नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत तुषार विजय वैद्य (वय 36, रा. रेणुकामाता मंदिर अमरापूर, ता. शेवगाव) यांनी फिर्याद दिली होती.

शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथील रेणुकामाता मंदिरात 18 ऑगस्टला चोरी झाली होती. यामध्ये देवीचे 16 लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या घटनेची नोंद सीसीटीव्हीत झाली होती. सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

मंदिरातील चोरीची घटना संवेदनशील असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या घटनेच्या तपासासाठी पोलीस पथके नेमली होती. पोलीस तपास करीत असताना पोलीस निरीक्षक आहेर यांना ही चोरी हातराळ (ता. पाथर्डी) येथील गणपत केदार याने केल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत केदार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अजय चव्हाण, जॅकसन उर्फ किशोर जाधव आणि दोन विधीसंघर्षित बालक यांच्या सोबत चोरी केल्याचे कबूल केले. तसेच त्याने शेतात चोरीचे दागिने पुरून ठेवल्याचे सांगितले.

पोलिसांनी शेतात जाऊन दागिने हस्तगत केले. त्यानंतर पोलिसांनी माळाबाभूळगाव (ता. पाथर्डी) येथून अजय चव्हाण आणि किशोर जाधव यांच्यासह दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपींकडून 22 गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपींकडून सात लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, हेमंत थोरात, तुषार धाकराव, सोपान गोरे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सुरेश माळी, अतुल लोटके, रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले, संतोष लोढे, सचिन अडबल, विजय ठोंबरे आदींच्या पथकाने केली.