सातव्या वेतन आयोगासाठी शिक्षक भारतीचे उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षक भारती संघटनेने खासगी प्राथमिक शाळांना थकबाकीसह सातवा वेतन आयोग व विनाअनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान मिळण्यासाठी साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्क येथे हे आंदोलन होणार आहे.

शिक्षक भारती संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी दिली. कोरोनाच्या काळात मुंबई महानगरपालिकेने अतिशय उत्कृष्ट असे काम केलेले आहे. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱया महानगरपालिकेने शिक्षण क्षेत्राकडे मात्र दुर्लक्ष केले असल्याचा आरोप शिक्षक भारतीने केला. मुंबई महानगरपालिकेने आपल्या एक लाख कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग दिला, परंतु खासगी प्राथमिक शाळांतील केवळ 3900 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांना पाच वर्षे होऊनही सातवा वेतन आयोग दिलेला नाही. या भेदभावामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिवाय 500 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महानगरपालिकेकडे गेली 15 वर्षे अनुदान मागत आहेत त्यांनाही अनुदान देण्यात आलेले नाही.

संपूर्ण थकबाकीसह सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे, विनानुदानित शाळांना तत्काळ 100 टक्के अनुदान मिळाले पाहिजे आणि खासगी अनुदानित शाळांतील मुलांना समान हक्क मिळावेत या मागण्यांसाठी महात्मा गांधी जयंतीपासून कोरोना नियमांचे पालन करून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दररोज चारजण सुरक्षित अंतर ठेवून बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याचे संघटनेचे सुभाष मोरे यांनी सांगितले. शिक्षक भारती संघटनेच्या मागण्या मान्य करण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे.