
पोर्नोग्राफीप्रकरणी पती राज कुंद्रा याच्या अटकेमुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आयुष्यातील कठीण काळ सध्या सुरू आहे. आपल्या मनातील भावना अनेकदा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे व्यक्त करताना दिसते. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली असून त्यातून ती भविष्याबाबत लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे समजते.
शिल्पाने शनिवारी इन्स्टाग्राम स्टोरीवर लेखक कार्ल बार्ड यांच्या पुस्तकातील एक पान शेअर केले आहे. ‘न्यू एण्डिंग’ असे या चॅप्टरचे नाव आहे. त्यात लिहिलेय, ‘‘कोणतीही व्यक्ती पुन्हा मागे जाऊ शकत नाही, मात्र एक नवी सुरुवात नक्कीच करू शकते. आतापासून सुरुवात करून शेवट उत्तम करू शकतो. माणूस आपला जास्त वेळ चुका आणि चुकीच्या निर्णयांचा विचार करण्यात घालवतो. खूप विचार केल्यानंतर आपण आयुष्यात चुकीचे निर्णय घेतले होते हे आपल्या लक्षात येते, मात्र कितीही विचार केला तरी भूतकाळ बदलता येत नाही. मात्र भविष्यात योग्य निर्णय घेत चांगल्या लोकांसोबत पुढे जाऊ शकतो.’’ पुस्तकात शेवटी म्हटलेय, ‘‘मी भूतकाळात काय केले यावरून माझी पारख होऊ नये, तर भविष्यकाळात मी उत्तम आयुष्याची रचना करू शकते. शिल्पाच्या या पोस्टमुळे ती राजपासून वेगळी असल्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्या आहेत.’’
दरम्यान, ‘‘मी कामात व्यस्त असल्याने राज कुंद्रा काय करत होते याबाबत आपल्याला काहीच कल्पना नव्हती,’’ असे शिल्पाने अलीकडेच पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले होते.
मला बळीचा बकरा बनवलं – राज कुंद्रा
दरम्यान, राज कुंद्रा याच्या वतीने शनिवारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मला बळीचा बकरा बनवले गेले असून पुरवणी आरोपपत्रात माझ्याविराधोत एकही पुरावा नाही, असा दावा करण्यात आला आहे. तसेच आपल्याविरोधातली चौकशी प्रॅक्टिकली पूर्ण झाल्याचेही त्याने म्हटले आहे. अलीकडेच राज कुंद्रा याच्यासह तीन अन्य आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी दीड हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.




























































