
कोकणात शिमगोत्सवाला (होळी) फाक पंचमीला सुरुवात होते. तेरसे आणि भद्रेसारख्या अनेक गावांमध्ये होळीच्या परंपरेनुसार शिमग्याला प्रारंभ होतो. रत्नागिरी, संगमेश्वर पट्ट्यात तेरसे मुहूर्तावर होळीचे होम लावले जातात. कोकणात शिमगोत्सवाचे पडघम आज पासून सुरू झाले. आज पहिले तेरसे शिमगे पार पडले म्हणजे तेरसे होळीचे होम उत्साह व जल्लोष पूर्ण वातावरणात पार पडले असून उद्या शिमगोत्सवावर ग्रहणाचे सावट पडले असून पुढील भद्रे व पौर्णिमेचे शिंमगे एक दिवस पुढे गेले असून त्यांचे होलिकोत्सवातील होम ३ तारखे पासून पाठोपाठ होम लागणार आहेत. या ग्रहणामुळे चाकरमान्यांना आपला शिमगोत्सवाचा कार्यक्रम बदलावा लागला.
कोकणातील शिमगोत्सव १४ फेब्रुवारी पासून प्रत्यक्षात सुरू झाला असून गेल्या शनिवारी २१ तारखेला फाक पंचमी सुरु झाली तर रविवार सकाळ पासून खेळे बाहेर पडले ते सोमवारी व नंतर मंगळवारी देवाचे हे खेळे पार पडले, शनिवारी २८ तारखेला शिमगोत्सवातील गोड्या सणाला सुरुवात होऊन शनिवारी पालखीमध्ये देव मंदिरातून विराजमान झाले व त्या रात्री पासून प्रथम शिमगोत्सवातील माड आणले गेले व पहाटे पर्यंत समस्त चाकरमानी व ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या सहभागाने ढोल ताशांच्या गजरात फाका घालत माड उभे राहिले. त्या पैकी पहिले तेरस आज दुपारी १ वाजता शिमगोत्सवाचे होम गावो गाव लागले होळ्या पेटवण्यात आल्या.
आज करजुवे फुणगुस अन्य खाडी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये तेरसे शिमगे पार पडले व होळींना होम लावण्यात आले. मानानुसार होमा मध्ये नारळ फेकण्याचे होळीतील महत्वाचे कार्य पार पडले तर गावागावातील नवं दाम्पत्यांनी लग्ना नंतर जोडीने प्रथेनुसार होळीमध्ये नारळ फेकण्याचे काम करून प्रथा जोपासल्या. होलिको उत्सवात या प्रथेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. होम पार पडल्या नंतर होळीच्या कुठावर समस्त मानकऱ्यांनी होळीच्या कुठाला प्रदक्षिणा घालून प्रथा पार पाडली. व त्यानंतर होळी कुठावर माहेर वासिनींनी ओट्या भरल्या. आज संध्याकाळ पासून पालख्या गाव प्रदक्षिणेत बाहेर पडणार आहेत. हा शिमगोत्सव १९ मार्च पाडव्या पर्यंत चालू राहणार असून पाडव्याच्या दिवशी माड तोडण्याचा महत्वपूर्ण कार्यक्रम होऊन समाप्ती होईल.


























































