शिंदे गटाचे विद्या संकुलात झिंग झिंग झिंगाट, दारू-बीअरच्या बाटल्यांचा खच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीकेसीवर आयोजित दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिंदे गटाच्या जमवलेल्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात झिंग झिंग झिंगाट केल्याचे उघड झाले आहे. मेळाव्याच्या नावावर जिवाची मुंबई करण्यासाठी आलेल्या लोकांनी शिक्षणाच्या पवित्र मंदिरात दारूच्या पाटर्य़ा आणि जेवणावळी केल्याचे उघड झाले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात शिंदे गटाच्या कार पार्किंगसाठी जागा देण्यात आली होती, पण कार पार्किंगच्या नावाखाली शिंदे गटाने कलिना संकुलात धुडगूस घातल्याचे उघड झाले आहे. शिंदे गटाचा मेळावा झाल्यावर गुरुवारी सकाळी युवा सेनेच्या पदाधिकाऱयांनी कलिना संकुलाला भेट दिली तेव्हा अत्यंत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. जागोजागी कचरा, पाण्याच्या बाटल्यांचा आणि बीअर आणि दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे दिसून आले. केवळ दारूच्या पाटर्य़ा नव्हे तर जेवण तयार करण्यात आले. जेवण शिजवायला परवानगी कशी मिळाली. त्यासाठी आरोग्य खात्याची परवानगी घेतली होती का असा प्रश्न युवा सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. विद्यापीठातील जागा शासकीय कार्यक्रमालाही दिली जात नाही मग राजकीय कार्यक्रमाला कशी दिली, असा सवालही युवा सेनेने केला आहे.

हेलिपॅडवर बस पार्किंग, विद्यापीठाची कचराकुंडी, गेटही तोडला

संकुलातील हेलिपॅडवर गाडय़ा पार्क केल्याचे उघड झाले आहे. सकाळी या हेलिपॅडवर कचऱ्याचे वर्गीकरण सुरू होते. कचरा वाहून नेण्यासाठी आलेला डंपर हेलिपॅडवर पार्क केला होता, असा आरोप युवा सेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केला. वास्तविक हेलिपॅडची सुरक्षा लक्षात घेऊन बीकेसीकडून हेलिपॅडकडे येणारा गेट कुलगुरूंनी बंद केला होता. फक्त सरकारी अधिकाऱयांना या गेटमधून प्रवेशाची मुभा होती. पण या मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या गाडय़ांना प्रवेश देण्यात आला. या वाहनांनी आत प्रवेश करताना गेटही तोडल्याचा आरोप प्रदीप सावंत यांनी केला आहे.

राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांकडे युवासेनेची तक्रार

राजकीय पक्षाच्या मेळाव्याच्या पार्किंगसाठी मुंबई विद्यापीठाची जागा फुकटात देणारे मुंबई विद्यापीठ आणि दारू पाटर्य़ा करणाऱया शिंदे गटाविरोधात युवासेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. विद्यापीठाची जागा भाडय़ाने देण्यासंदर्भात नियमावली तयार करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले. तसेच पार्किंगसोबत विद्यापीठात अन्न शिजविण्याची परवानगीदेखील देण्यात आली होती का याची चौकशी करून विद्यापीठाचे पावित्र्य नष्ट करणाऱयांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी युवासेनेने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.