
साई मंदिरातील वाढती गर्दी लक्षात घेता मंदिरातील दर्शन मर्यादा दिवसाला सहा हजारांवरून बारा हजार करण्यात आली असून, दर्शनासाठी येणाऱया भक्तांनी ऑनलाइन बुकिंग करूनच यावे. सुट्टीच्या दिवशी ऑफलाइन बुकिंग काऊंटर बंद राहील. त्याचप्रमाणे नाताळ सुट्टीत व नवीन वर्षाच्या प्रारंभी शिर्डीत पालख्या आणू नये, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केले आहे.
साई मंदिर सुरू झाल्यापासून आजपर्यंत 3 लाख 32 हजारांहून अधिक भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले आहे. दिवसेंदिवस शिर्डीतील भाविकांची गर्दी वाढत असून गुरुवार, शनिवार, रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी गर्दीत जादा वाढ होत आहे. या दिवशी साधारण पंधरा हजारांपेक्षा अधिक भाविक दर्शनाला येत आहेत. गर्दीच्या काळात जास्तीत जास्त बारा हजार भाविकांना दर्शन देणे शक्य असून, ऑनलाइन बुकिंग न करता थेट शिर्डीत येणाऱया भाविकांमुळे व वाढत्या गर्दीमुळे दर्शन देणे शक्य होणार नाही. गर्दी वाढल्यास दर्शन बंद करावे लागेल, असे संस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात
आले आहे.
अधिक गर्दी झाल्यास दर्शन बंद
नाताळ सुट्टी, नवीन वर्षाची सुरुवात या काळात गर्दी होण्याचा संभव असून, प्रमाणापेक्षा अधिक गर्दी झाल्यास दर्शन व्यवस्था बंद केली जाईल. 31 डिसेंबर रोजी यापूर्वी साई मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात येत होते. यंदा मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही बगाटे यांनी सांगितले.
ऑनलाइन बुकिंगनंतरच दर्शन
भक्तांनी नियोजित दर्शन तारखेची पेड पास आरक्षण सुविधा पाच दिवस अगोदर, तर मोफत दर्शन पास सुविधा दोन दिवस अगोदर https://online.sai.org.in// या वेबसाइटवर आरक्षित करावे. दर दिवशी 12 हजार भाविकांना दर्शन दिले जाईल. त्यात 4 हजार पास पेड पास, तर 8 हजार मोफत पास असतील. सर्व ऑनलाइन बुकिंगवर दर्शन मिळणार असून, पास न घेता थेट दर्शनासाठी आल्यास गैरसोय होईल, असे म्हटले आहे.






























































