
रविवारच्या सुट्टीची पर्वणी साधत साईभक्तांनी शिर्डीत अलोट गर्दी केली. मात्र, यावेळी कोरोनाच्या नियमांचे कुठेही पालन करण्यात आल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, भाविकांनी दर्शनासाठी गर्दी न करण्याचे आवाहन साईबाबा संस्थानकडून करण्यात येत आहे.
दिवाळी पाडव्यापासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली झाली आहेत. तेव्हापासून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दररोज गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करून दर्शन दिले जात असले, तरी वाढत्या गर्दीमुळे संस्थानचे नियोजन तोकडे पडत आहे. सुरुवातीला दररोज सहा हजार ते जास्तीत आठ हजार भाविकांना दर्शनाची सुविधा असताना नऊ ते दहा हजार भाविक दिवसभरात दर्शन घेत आहेत. दुपारी आरतीच्या आधी साफसफाईची वेळ कमी करून ती वेळ दर्शनासाठी वाढविण्यात आली आहे. मंदिर सुरू झाल्यानंतर आज पहिलाच रविवार असल्याने मोठय़ा संख्येने भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले.
पेड पास बंद ठेवण्याची वेळ
साईबाबा संस्थानकडून वारंवार आवाहन करूनही काही भाविक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. सशुल्क दर्शनासाठी गर्दी झाल्याने काही वेळ पेड पास बंद ठेवण्यात आले होते. दर्शनरांगेतही भाविकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंतच साडेपाच हजारांहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. वृद्ध व लहान मुलांना दर्शनास बंदी असतानाही भाविक दर्शनासाठी हट्ट धरताना दिसत आहेत.































































