
तीन दिवसीय रामनवमी उत्सवाच्या सांगतेच्या दिवशीच शिर्डीत सुरक्षा रक्षक व साईभक्तांमध्ये मारहाण झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. समाज माध्यमात या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी भक्ताच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केलीय.
गेल्या तीन दिवसांपासून शिर्डीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात येत असून राज्यच नव्हे देशभरातील लाखो भाविकांनी साईंच्या दर्शनाला गर्दी केली होती. राज्यभरातून अनेक पायी पालख्या देखील शिर्डीत आल्या. अश्याच एका मुंबईहून शिर्डीत पायी पालखी घेऊन येणाच्या साईभक्त आणी साईबाबा संस्थान सुरक्षारक्षकात आज दुपारी मारहाणीची घटना घडलीय. मंदिर परिसरातून बाहेर पडलेल्या एका भक्ताने 5 नंबर एक्झिट गेटमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षारक्षकांनी मज्जाव केल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वादावादी झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. साईभक्ताच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. क्तांनी सुद्धा वावरताना नियमांचे पालन केले पाहिजे व सुरक्षा रक्षकांनी सुद्धा असा प्रसंग उदभवल्यास कायदा हातात न घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
यापूर्वीही अनेकदा शिर्डीत सुरक्षा रक्षक व साईभक्तांच्या वादाच्या घटना घडल्या आहेत. देशविदेशातील साईभक्त शिर्डीत आल्यानंतर ख-या अर्थाने त्यांच्याशी त्यांना आदराने आणी विनम्रपणे बोलायला हवे यासाठी शेगावच्या धर्तीवर साइसेवक योजना सुद्धा राबविण्यात आलीय.


























































