
>> शिरीष कणेकर
हिंदुस्थानी क्रिकेट संघाला लीडस् येथील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या डावात 78 धावांमध्ये गडगडणारा हिंदुस्थानचा संघ दुसऱ्या डावात 278 धावांमध्येच गारद झाला. अवघ्या 100 मिनिटांत टीम इंडियाचा खेळ खल्लास झाला.
यजमान इंग्लंडने तिसरा कसोटी सामना एक डाव 76 धावांनी जिंकून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. हिंदुस्थानचा हा या वर्षातील सर्वात मोठा पराभव ठरला. दुसऱ्या डावात हिंदुस्थानचा निम्मा संघ गारद करणाऱ्या ओली रॉबीनसनची ‘प्लेयर ऑफ दी मॅच’ म्हणून निवड करण्यात आली.
हिंदुस्थानने शनिवारी 2 बाद 215 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. पण टीम इंडियाच्या उर्वरित आठ फलंदाजांनी अवघ्या 84 धावांत पॅव्हेलियनचा रस्ता पकडला.
इंग्लंडने संपूर्ण वचपा काढला
मंत्रीपद मिळालं म्हणून काहीही वायफळ बरळायचं नसतं आणि एक मॅच जिंकलो म्हणून जास्त उडायचं नसतं.
तात्पर्य – तोंडावर मजबूत आपटायला होतं.
कोणीसं हे मला पाठविलं आणि एकदम पटलं बघा. दुसऱ्या कसोटी सामन्यातील लॉर्डस्वरील अद्भुत विजयानंतर सुनील गावसकरसारखा महान क्रिकेटपटू व अग्रणी तज्ञदेखील वाहवत गेला आणि म्हणाला, ‘आपण ही मालिका तीन-शून्य किंवा चार-शून्यने आरामात जिंकू. कारण इंग्लंड केवळ दोन खेळाडूंच्या जिवावर खेळतंय. गोलंदाज ऍण्डरसन व फलंदाज रूट.’
त्यानंतर लीडस्वरच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी सगळेच फासे उलटे पडले. इतके की हाच तो इंग्लिश संघ का व हाच तो हिंदुस्थानी संघ का, असा प्रश्न पडावा इतके खेळाचे रंग बदलले होते, तेही पहिल्याच दिवशी.
ऍण्डरसन हा निव्वळ चमत्कार आहे. एकोणचाळिसाव्या वर्षी त्याच्या गोलंदाजीत कमालीची भेदकता आढळते. मारक व भेदक गोलंदाजी करण्यासाठी भरमसाट वेगाची गरज नाही हे ऍण्डरसननं सप्रमाण दाखवून दिलंय. खुद्द इंग्लंडकडे व जगातील अन्य देशांकडे ऍण्डरसनपेक्षा अधिक वेगवान गोलंदाज आहेत. परंतु त्यातलं कोणीही ऍण्डरसनपेक्षा अधिक व जास्त सातत्याने विकेटस् काढू शकलेला नाही. लाइन, लेंग्थ व स्विंगवरील हुकूमत यांनी मिळून ऍण्डरसन घडवलाय. पहिल्या डावात अवघी आठ षटके टाकून व त्यातली पाच निर्धाव टाकून ऍण्डरसननं राहुल, पुजारा व कर्णधार कोहली हे बिनीचे शिलेदार गारद केले. आणखीही तीन-चार विकेट गुंडाळणं त्याला सहज शक्य होतं. पण कर्णधार रूटनं त्याला विश्रांती देण्याचं ठरविलं. रॉबिन्सन, करण व ओव्हर्टन यांनीही हात धुऊन घेतल्यामुळे ऍण्डरसनच्या हातात दुसऱ्या स्पेलसाठी चेंडू देण्याची रूटला गरजच पडली नाही.
नाणेफेक जिंकून कोहलीनं फलंदाजी घेतली याचा अर्थच विकेट जिवंत असल्याचा त्याला जराही अंदाज आला नव्हता. कर्णधार म्हणून त्याचं हे अपयशच मानावं लागेल. विराट कोहली कसोटी, एकदिवसीय व टी-20 या तिन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सलग पन्नास डावांत शतकापासून वंचित राहिलेला आहे. हिला धोक्याची घंटा म्हणायची का? एवढय़ात नको.
रोहित शर्मा पहिल्या डावात शंभरच्या वर चेंडू खेळत उभा राहिला व डावातील सर्वोच्च धावसंख्या (केवळ 19) त्याच्या नावावर लागली. कसोटी क्रिकेटसाठी त्याने आपला खेळ पूर्णपणे बदललाय. त्यानं बचावावर भर दिलाय. (तरीही नको तेव्हा हुक किंवा पुलवर विकेट फेकतोच.) तो आल्या आल्या बाद होत नाही. पण त्याच्या बॅटीतून जास्त धावा व्हायला हव्यात. राहुल-शर्मा ही सलामीची जोडी तूर्तास तरी भक्कम व विश्वासार्ह वाटतेय. पण मधली फळी पूर्णपणे कोलमडलीय. पुजारा, कोहली व रहाणे यांची जणू कोणी हवाच काढून टाकलीय. सलामीच्या जोडीनंतर एकदम जडेजा ही परिस्थिती चांगली नाही. भक्कम म्हटली जाणारी फलंदाजी एकाएकी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली तर काय म्हणणार? पहिल्याच दिवशी हिंदुस्थानचा सुपडा साफ केल्यावर इंग्लंडनं एकही गडी न गमावता 42 धावांची आघाडी घेतली.
वास्तविक इथेच सामन्याचा निकाल लागल्यात जमा होता, पण गेल्या वर्ष-दोन वर्षांत आपल्या संघाने मैदानावर मर्दुमकी गाजवून सामने अनिर्णात राखले होते, काही जिंकलेही होते. याही वेळेला असला काही चमत्कार घडेल ही अतार्किक अंधूक आशा मनात धुगधुगत होती. इंग्लंडनं ती धुळीस मिळवली.
त्याच विकेटवर इंग्लंडनं चारशे धावांचा डोंगर उभा केला. (आपला खेळखंडोबा झाल्यानंतर इंग्लंड फलंदाजीला उतरल्याक्षणी विकेटनं सरडय़ाप्रमाणे रंग बदलला, ती गोलंदाजधार्जिणी होती ती लागलीच फलंदाजधार्जिणी झाली, असे टी.व्ही.वरच्या तज्ञ समालोचकांनी आम्हाला सांगितले.) आपल्या पहिल्या चार फलंदाजांच्या धावा अशा होत्या – रोहित शर्मा 19, के. एल. राहुल 0, चेतेश्वर पुजारा – 1, विरोट कोहली 7, इंग्लंडच्या पहिल्या चार फलंदाजांच्या धावा अशा होत्या – बर्न्स 61, हसीब 68, मलान 70, रूट 121.
दुसऱ्या दिवसअखेर सामना इंग्लंडच्या खिशात गेल्यात जमा होता. पहिल्या सामन्यात पावसानं हिंदुस्थानच्या हातातोंडाशी आलेला विजय हिरावून घेतला होता. या खेपेला ओळीनं तीन दिवस पडून विकेट व मैदान खराब करण्याचं मदतकार्य पावसानं केलं नाही. हिंदुस्थानी संघ 78 धावांत गारद झाला तेव्हाच सामन्याचा निकाल निश्चित झाला होता. तोच लागला.
लीडस्वरच्या सामन्याच्या दर दिवसअखेर सामन्याचे बदलते रंग टिपणे, निकालांचा अंदाज बांधणे मनोरंजक ठरतंय. आज तिसऱ्या दिवसअखेर हिंदुस्थाननं दुसऱ्या डावात भक्कम लढत दिली. दोन बाद 215 हे उत्तम दमदार होते. प्रथमच मधली फळी टिच्चून विकेटवर उभी राहिली. पुजारा व कोहली यांनी 99 धावांची भागीदारी केली. अंधूक आशा पल्लवित झाल्या. परंतु पहिल्या डावातील ससेहोलपट एवढी जबरदस्त होती की दुसऱ्या डावातील प्रतिकार कमीच पडला. सुनील गावसकर टी.व्ही.वर 180 धावांची आघाडी घेण्याच्या गोष्टी बोलत होता आणि इकडे नवीन चेंडूवर पुजारा, कोहली व रहाणे ही मधली फळी कापून निघाली. इंग्लंडच्या फलंदाजीच्या वेळी सुधारलेली विकेट हिंदुस्थानच्या फलंदाजीच्या वेळी जणू दुसऱ्यांदा कोलमडली. खरी गोष्ट अशी हाती की त्या विकेटवर व त्या ढगाळ वातावरणात चेंडू स्विंग करण्याचे कसब इंग्लिश गोलंदाजांना अवगत होते व आपल्या गोलंदाजांना नव्हते. रोहित व पुजारा कितीही जिद्दीनं उभे राहिले असले तरी ते वारंवार ‘बीट’ होत होते व चेंडू त्यांच्या पॅडवर आदळत होते. (शेवटी दोघंही जम बसून पायचीत झाले.) दोघांकडून खूप जास्त अपेक्षा होत्या म्हणणारे म्हणतील की जे खेळले त्यांच्यावरच दात. तसंच असतं. संघातील सर्व फलंदाज एक वेळी मोठी धावसंख्या उभारत नसतात. ज्याची ‘हट्टी’ लागते, ज्याचे पाय चालतात, ज्याला फॉर्म गवसतो त्यानंच कर्तबगारी दाखवायची असते. एरवी रोहित (59), पुजारा (91) व कोहली (55) यांची आपण पाठ थोपटली असती पण इथे ते थिटे पडले असेच खेदानं म्हणावे लागते.
शेवटचे तीन दिवस खेळून काढणे ही अशक्यप्राय गोष्ट होती. दोन बाद 215 या धावसंख्येवरून हिंदुस्थान सामना अनिर्णीत राखतो की काय अशी उगीचच आशा वाटू लागली होती. ती फोल ठरली. पहिल्या डावातील 78 ही तुटपुंजी धावसंख्या संघाला भोवली. पराभव अटळ होता. मालिकेत आजवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या संघाने पूर्णपणे बचावात्मक खेळ केला तो कितपत योग्य होता याचा तातडीने साधकबाधक विचार व्हायला हवा. जडेजाची फलंदाजी व क्षेत्ररक्षण यांना झुकतं माप देऊन जगातील सर्वोत्कृष्ट ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याला सातत्यानं संघाबाहेर ठेवणं हे धोरण आपल्याला महागात पडलंय. लीडस्वरही त्याला खेळवण्यात आलं नाही, कारण संघनिवड समितीला आधीच्या सामन्यातील ‘विनिंग कॉम्बिनेशन’ बदलायचे नव्हते. आता? केवळ नवीन चेंडूवर बाद न होता तो तटवून खेळून काढणे हे धोरणही चुकीचे ठरतंय. शंभरच्या वर चेंडू खेळून 19 ही संघातील सर्वोच्च धावसंख्या काढणाऱ्या रोहित शर्मानं नेमकं काय साधलं? अख्खा संघ 78 धावांत उखडला गेलाच ना?
थोडक्यात काय, लीडस्वर इंग्लंडनं संपूर्ण वचपा काढला.




























































