शिरीषायन – अंगणात फुलल्या जाईजुई

>> शिरीष कणेकर

का कोणास ठाऊक, मेक्सिकोमध्ये जायची मला अतीव इच्छा होती. सगळं सुंदर जग सोडून मला मेक्सिकोलाच का जायचं होतं, विचारू नका. इंग्लंडला जाऊन रिकाम्या बसलेल्या अश्विनबरोबर मला आईस्क्रीम का खायचं होतं हेही विचारू नका. एक म्हणजे कर्णधार कोहली माझं काही वाईट करू शकत नव्हता. मी संघातच नव्हतो तर माझं तो वाईट कसं व काय करणार? लवकरच पुजारा व राहणे आम्हाला जॉइन होऊ शकले असते, पण चार आईस्क्रीमचे इंग्लिश चलनात पैसे कोण देणार? त्यासाठी कोहलीलाच शरण जावं लागलं असतं. नुकतंच मी वाचलं होतं की, आपलं क्रिकेट कंट्रोल बोर्ड कोहलीला सात कोटी रुपये वर्षाचा पगार देते. जाहिराती व अन्य मार्गाने येणारे उत्पन्न वेगळे. म्हणजे नवीन इलेक्ट्रिक शेव्हर घ्यायचा झाला तर त्याला अनुष्का शर्मापुढे हात पसरायला नको (मला वाटत होतं, त्यासाठी तो दाढी करत नाही. त्याचा शेव्हर वापरणारे रोहित शर्मा, राहुल, पुजारा, रहाणे, बुमराह यांनाही नाइलाजानं दाढी वाढवावी लागते. अश्विन बसतो एकटाच स्वतःच्या शेव्हरनं दाढी घोटत आणि आपण कोहलीची तासतोय अशी मनाची समजूत करून घेतो). असो.

एक बातमी वाचली आणि मेक्सिकोला जायची माझी इच्छा एकाएकी मावळली. मल्लिका शेरावतसारखी. पोलिसांपर्यंत गेलेल्या मेक्सिकोतील एका अहिंसक, पण उग्र भांडणाविषयी ती बातमी होती. आमच्या बिल्डिंगमधल्या भांडणांचा दरवळ सुटलेला असताना भांडणं पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी व करण्यासाठी मी मेक्सिकोला कशाला बोंबलत जाऊ? (एखाद्या रविवारी आमच्या घरातून मटनाचा वास आला नाही तर माझे शेजारी भांडण उकरून काढतात. मग वाडगाभर पापलेटचं कालवण देऊन आज मटण केलं नव्हतं हे आम्हाला सिद्ध करावं लागतं).

मेक्सिकोतील ‘द सन’ नावाच्या वृत्तपत्राने ‘क्विंटाना रू’ या गावात घडलेली जगावेळी घटना दिल्येय (वृत्तपत्रात आलं त्यावर जाऊ नका. गोष्ट खरी आहे). युवित्सा या बेचाळीस वर्षीय विवाहित महिलेने कुंपणापलीकडे राहणाऱ्या तेवीस वर्षीय युवतीविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे. इथे कुंपण पलीकडचं हिरवंगार राखीव कुरण खाईल अशी निबर युवित्साला भीती आहे. ही भीती तिच्या मते साधार आहे.

बेचाळीस वर्षांच्या युवित्सानं ज्या तेवीस वर्षांच्या मुलीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवल्येय तिचं नाव वृत्तपत्रानं दिलेलं नाही. बरोबरच आहे. तेवीस वर्षीय म्हटलं की, त्यात सगळं आलं. उगीच तिचं नाव देऊन वृत्तपत्रातील मोलाची जागा का अडवा? अलीकडे विजय मल्ल्या, नीरव मोदी, आसाराम बापू या ‘हेवी वेटां’ची नावंदेखील टाळण्यात येतात. उगीच करदात्या, पापभिरू, सन्मार्गी नागरिकांना खचून जायला होतं.

खरं म्हणजे युवित्साचं नाव (ते चिकित्सासारखं वाटतं) तरी कशाला द्यायचं? त्यात शशी थरूरलाही इंटरेस्ट नसेल. जाऊ दे, युवित्साचं असं ठाम म्हणणं होतं की, तेवीस वर्षीय रूपगर्विता तिच्या कंपाऊंडमध्ये तिची अंतर्वस्त्र दोरीवर वाळत घालते. युवित्साच्या नवऱ्याला चाळवायचं हा तिचा एकमेव उद्देश आहे. घरात कपडे वाळत घालायला काय होतं? आम्ही नाही घालत? उन्हात लवकर सुकतात म्हणे. युवित्साचं म्हणणं असंही आहे की, माझा नवरा तसा गरीब व सरळमार्गी आहे; पण तोही शेवटी पुरुषच आहे ना? विरघळणारच. तिचा हेतू जर शुद्ध असता तर मी अनेक वेळा परिप्रकारे सांगूनही तिनं बाहेर उघडय़ावर कपडे वाळत टाकणे थांबवले नसते का? माझा नवराही काहीतरी निमित्त करून बाहेर घुटमळत असतो. मी हतबल आहे. पोलीस तिच्यापेक्षाही हतबुद्ध झाले. काय करावं, त्यांना कळेना. बाहेर स्वतःच्या अंगणात, कुंपणाच्या आत कपडे वाळत टाकणे हा कुठल्याही कायद्यानुसार गुन्हा ठरत नव्हता. तिला परावृत्त करता येत नव्हतं, थांबवता येत नव्हतं. पोलिसांनी हात वर केले. युवित्सानं नाइलाजानं पराभव स्वीकारला.

माझ्या उच्च पातळीवरच्या ‘सोअर्स’नी मला सांगितले की, ‘क्विंटाना रू’मधल्या या प्रकारावरून तिथल्या पोलीसप्रमुखाला एक जालीम आयडिया सुचली. त्यानं युवित्साला दुसरी जागा देऊन स्वतः तिची जागा विकत घेतली. त्याच्या मानवतावादी कृतीनं युवित्सा भारावली.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीसप्रमुख अंगणात जाऊन उभा राहिला.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या