
>> शिरीष कणेकर
वांद्रय़ाला कार्टर रोडवर समुद्रकिनारी असलेल्या संगीतकार नौशादच्या टोलेजंग बंगल्यातील भलामोठा पियानो ठेवलेल्या दिवाणखान्यात मी नौशादशी बोलत बसलो होतो. त्या संगीत महर्षीच्या दिगंत कीर्तीपुढे मी दबलो होतो. (त्यामुळे आतून आलेला गार चहाही मी तसाच ढोसला)
आपल्या देदीप्यमान संगीत प्रवासाविषयी भावुक होत तो म्हणाला, ‘‘लता गा रही थी – ‘मोहे भूल गए सांवरिया’ और कादरबक्ष रो रहा था।’’
मी समजल्यागत मान डोलावली.
नौशाद पुढे म्हणाला, ‘‘लता गा रही थी ‘मर गए हम, जीते जी मालिक’ और कादरबक्ष रो रहा था।’’
मी पुन्हा मान डोलावली.
नौशाद चालूच होता, ‘‘लता गा रही थी – ‘तीर खाते जाएंगे’ और कादरबक्ष रो रहा था।’’
मला कळेना की, विख्यात सारंगीया कादरबक्ष हा नौशादच्या वाद्यवृंदात सारंगीची साथ करायला होता की लताचा गंगेसारखा पवित्र सूर ऐकून रडायला होता. लता अशीच गाणार आणि प्रत्येक वेळेला कादरबक्ष हुकमी रडणार? मग सारंगी कोण वाजवणार? मी हे अर्थातच नौशादला विचारलं नाही. माझी तेवढी हिंमतच नव्हती. ही सगळी टिवटिव आता.
बोलता बोलता नौशाद म्हणाला, ‘‘लताचे मराठमोळे उच्चार मी सुधारले. मी तिच्या जिभेवर उर्दू ‘अल्फाज’ चढवले.’’
मी हे लताकडे ‘कन्फर्म’ करायला गेलो तर माझ्याकडे रोखून बघत ती म्हणाली, ‘‘माझे उच्चार नौशादने सुधारले?’’
‘‘असं तो म्हणत होता खरा’’ मी लपण्याची जागा शोधत म्हणालो.
‘‘मला सांगा’’. लता सरसावत म्हणाली, ‘‘नौशादने माझे उच्चार जर सुधारले तर त्याच्याकडे गाण्यापूर्वी मी जी गाणी गायली त्यात माझे उच्चार सदोष असायला हवे होते. आहेत ते तसे? कशाचंही श्रेय काय लाटता? मी खास उर्दू आत्मसात करण्यासाठी शिकवणी ठेवली होती. तिथं मी शिकले. नौशादकडे नाही.’’
त्यानंतर कधीही नौशादचा विषय निघाला की, लता फणकाऱयानं म्हणायची, ‘‘ते तुमचे माझे शब्दोच्चार सुधारणारे नौशाद.’’
नौशादची मुलाखत संपवून मी निघालो तेव्हा नौशाद विषादानं म्हणाला, ‘‘लताची गाडी माझ्या घरावरून जाते, पण तिला आत डोकविण्याची बुद्धी होत नाही.’’
यावर मी काय बोलणार? माझ्या कानात नौशादनं संगीतबद्ध केलेली लताची गाणी (मायनस कादरबक्षचं रडणं) रुंजी घालत होती – ‘लो प्यार की हो गयी जीत’ (जादू), ‘ले जा मेरी दुवाएं’ (दीदार), ‘बचपन की मुहोब्बत को’ (बैजू बावरा), ‘उठाए जा उनके सितम’ (अंदाज), ‘न शिकवा है कोई’ (अमर), ‘मरना तेरी गली में’ (शबाब), ‘हमारे दिल से न जाना’ (उड़न खटौला)…
आशा भोसलेची मुलगी वर्षा खूप हुशार होती. तिची इंग्रजीवर हुकमत होती. ‘संडे ऑब्जर्व्हर’मधला तिचा स्तंभ वाचनीय व दिलचस्प असायचा. अनेकजण तिचा स्तंभ नियमितपणे वाचत असत. देव आनंद त्यांच्यातलाच एक.
एका भेटीत तो आशा भोसलेला हसत हसत म्हणाला, ‘‘आशा की बेटी भी अंग्रेजी लिखती है।’’
देव आनंदचे विधान किती निर्विष व निरुपद्रवी असणार हे मी जाणतो. छद्मीपणे बोलणे, तिरकस मल्लिनाथी करणे, टोमणा मारणे हे त्याच्या रक्तातच नव्हते. तो कौतुकानं बोलला. यातून वाईट अर्थ निघू शकतो याची त्याला कल्पनाच नव्हती.
लता भेटत नाही हे दुःख ‘गजल नवाज’ तलत मेहमूदनेही माझ्याजवळ बोलून दाखवलं होतं.
मी इमानेइतबारे ते लताच्या कानावर घातले. ती स्तब्ध झाली. थोडा वेळ ती काहीच बोलली नाही. मग हळुवारपणे म्हणाली, ‘‘काय झालंय सांगू का? ते भेटले की ‘वर्ल्ड टूर’ करायच्या गोष्टी बोलतात, पण त्यांचा आवाज गेलाय. ते पूर्वीसारखं गाऊ शकत नाहीत. मी त्यांच्यासह आमची गाजलेली द्वंद्वगीते कशी म्हणणार? पण हे सगळं मी त्यांना कसं सांगणार? ते दुखावले जातील, त्यांना खूप वाईट वाटेल. या माझ्या जुन्या मृदू सहगायकाला मी कसं दुखावू? म्हणून मी त्यांना भेटायचं टाळते. तसं अगदीच भेटत नाही असं नाही. त्यांच्या मुलाच्या लग्नाला मी गेले होते.’’
लताचा आवाज कातर झाला होता. माझ्या (व कदाचित तिच्याही) मनात ‘सीने में सुलगते है अरमाँ’, ‘दिल में समा गए सजन’, ‘जब जब फूल खिले’, ‘चाहे नैना चुराए’, ‘तुम अपनी याद भी’, ‘दिले बेकरार सोजा’, ‘मुहोब्बत में ऐसे जमाने भी आए’ ही अवीट गोडीची द्वंद्वगीते घुमत होती.माझ्या ‘यादों की बारात’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ात आम्ही पाच जणांचा लताच्या हस्ते सत्कार केला होता. त्यातला एक तलत होता. तो मंचावर गेला तेव्हा पार्श्वभूमीवर आम्ही सज्जादचं ‘संगदिल’मधील ‘दिल में समा गए’ वाजवलं. तलत हरखून गेला होता.
कार्यक्रमानंतर मी त्याचे आभार मानले तेव्हा तो मनापासून म्हणाला, ‘‘मीच तुझा ऋणी आहे. तुझ्यामुळे आज कितीतरी दिवसांनी लताला भेटण्याचा योग आला. थँक यू सो मच!’’





























































