पुणे काढते उणे-दुणे

24893

>> शिरीष कणेकर

मला पुण्याहून एका (निष्ठावंत) वाचकाचा फोन आला होता. मला धक्काच बसला. मला फोन करण्यावर त्यानं एवढा प्रचंड पैसा का खर्च केला असेल? आता महिनाभर बायकोला जेवू न देता तो ही रक्कम वळती करून घेणार असेल. शिवाय स्वतःच्या चहात दूध न घालता तो स्वतःला शिक्षा करून घेणार असेल. जो फोन मुंबईला लागला त्याला उलटा टांगून चाबकानं फटके मारण्याचे हिंस्र विचारही त्याच्या मनात डोकावले असणार. पण त्यासाठी चाबकावर खर्च करावा लागला असता. नसता त्रास शिंचा!

हा, तर त्या पुण्याच्या (निष्ठावंत हो! मला वाटत होतं की त्यांची निष्ठा फक्त दुपारच्या झोपेशी असते आणि बाकरवडीचा त्यांना जाज्वल्य अभिमान असतो.) वाचकानं मला मारून मेल्यासारखा आवाज काढत फोनवर म्हटले, ‘मला तुम्हाला भेटायचंय हो. काही करून भेटायचंय.’
‘मग या भेटायला.’

‘काय? मुंबईला?’ साधारण तापलेल्या तव्यावर बसल्यावर तोंडातून अशी किंकाळी बाहेर पडते. ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ गाण्याचं रेकॉर्डिंग होण्यापूर्वी काही क्षण गायक नरेंद्र चंचल यालाही म्हणे असेच तापल्या तव्यावर बसवले होते. त्यानंतर नुसता थंड तवा दिसला तरी चंचल बेंबीच्या देठापासून ओरडून गायला लागायचा. पुढे तो तवे विकणाऱया दुकानात नोकरीला लागल्याचे सांगतात.
‘म्हणजे काय? मुंबई काय असं लांब आलं? कितीतरी माणसं नोकरीधंद्याच्या निमित्तानं रोज पुणे-मुंबई अपडाऊन करतात. तुम्ही असे रिऍक्ट होताय जणू मी तुम्हाला आफ्रिकेच्या घनदाट जंगलातील एखाद्या झाडाच्या फांदीवर भेटायला बोलावतोय. खाली वाघ येरझऱया घालतील व वर आपण सुबोध भावेच्या ‘बायोपिक्स’वर बोलू.’ मी एका दमात म्हणालो.
माझ्या आवाजातील आक्रमक हिंस्रपणाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून तो म्हणाला, ‘हे बघा, माझा टेलिफोन नंबर आता तुमच्या फोनवर आलाच असेल. तो सेव्ह करा. पुण्यात याल तेव्हा त्या नंबरवर मला फोन करा, मग मी तुम्हाला माझा पत्ता देईन. कसं यायचं तेही सांगेन. मग रिक्षात बसा आणि माझ्याकडे या. आपण एक कप चहा पिऊ व मस्तपैकी दोन तास गप्पा मारू.’
‘एक कप चहावर दोन तास गप्पा? खोकल्याच्या औषधासारखा एक चमचा चहा घेतला तर किती वेळ बोलावं लागेल? रिक्षाचं भाडं मीच भरायचं असणार? तुम्हाला भेटल्याचा परमानंदही मलाच मिळणार आहे ना? एरवी कोण देतो मला एक कप चहा फुकट?’ मी सरबत्ती केली.
आता तो ‘वैशाली’त जाऊन बोलायला मोकळा – ‘लेखक जाऊ द्या, पण माणूस चांगला नाही. माझ्या एक कप चहाचीही त्याला किंमत नाही. कर्मदरिद्री कुठला!’
आजूबाजूचे सगळे ऐकणारे त्याचे गाववालेच असणार. ते लगेच सहमत होतील. आपला चहा थर्मासमधून घरोघर नेणाऱया व दुसऱयाला त्याचा चहा थर्मासमधून आणायला सांगणाऱया संस्कृतीतून सगळी रोपटी उगवलेली असणार.

लोक म्हणतात की, पुणे आता बदललंय. सदाशिव पेठेतली पोरं आता एकमेकांशी इंग्लिशमधून बोलतात (आधीच्या पिढीला कळू नये म्हणून असेल.) आमच्या काळात पटवर्धनांची क्षिप्रा ‘माल’ आहे, असं म्हणत. आता ‘क्षिप्रा इज ऍन आयटेम’ असं म्हणत असतील. एवढाच फरक. आमच्या काळी ती फलाणी सायकलच्या दुकानात दिसली होती ती आज उसाच्या गुऱहाळात होती, असं उत्तेजित सुरात म्हणत. आता फार तर दुकानं बदलली असतील. सायकलच्या दुकानाची जागा ‘मॉल’ने घेतली असेल व उसाच्या गुन्हाळाची जागा ‘ब्युटी पार्लर’ने घेतली असेल. पोरगी पटवण्यासाठी आजही पुण्याची पोरं सारसबागेतील गणपतीला साकडं घालत असतील व एक कप चहा तिघांत पित ‘रूपाली’मध्ये बाहेर काढेपर्यंत बसत असतील.
पुणेकर किनाई एकेका शब्दाला काही काळ लटकून राहतात. उदाहरणार्थ ‘उदंड.’ पुण्यात काय ‘उदंड’ थंडी होती माहित्येय. आम्ही उदंड पहाटेच निघालो. रस्त्यात उदंड खड्डे. आम्ही लोणावळय़ाला नाश्ता करायला थांबलो. डोशाबरोबर ‘उदंड’ चटणी… देव यांना उदंड बुद्धी देवो! थंडीसारखी, पहाटेसारखी, खड्डय़ांसारखी, चटणीसारखी. सगळं उदंड! हे शब्ददारिद्रय़ पुण्यासारख्या विद्यानगरीत तिथल्या सुपुत्रांनी जोपासावं ना! सत्यनारायणाच्या पूजेला म्हणून मित्रमंडळींना व नातेवाईकांना बोलावून त्यांच्या उपस्थितीत स्वतःचं लग्न करणारे कोणीएक पुण्यातच होऊन गेले ना?
अस्सल पुणेकर (हा काय प्रकार आहे? प्रत्येक पुणेकर हा अस्सलच असतो. त्यातलाच एखादा केदार जाधव ‘राऊंड आर्म’ गोलंदाजी करतो.) आनंद इंगळे या नटपुंगवासह मी मुंबईत इराण्याकडे चहा पीत होतो. कशावरून तरी तो मला म्हणाला, ‘आयला तुम्ही पण धन्यवादच आहात.’
‘धन्यवाद म्हणजे?’
‘तुम्हाला धन्यवाद शब्द माहीत नाही?’
‘नाही, धन्यवाद हा शब्द माहित्येय, पण माणूस धन्यवाद कसा असतो ते माहीत नाही.’
इंगळे काहीच बोलला नाही. त्यानं फक्त चेहरा तिरसट केला. तरी आम्ही सांगत होतो की मुंबईत आल्यावर संजय मोनेकडे राहू नकोस म्हणून. परवा मी बँकेच्या मॅनेजरला धन्यवाद म्हणालो. मार खाता खाता वाचलो. त्यावरून मी धडा घेतला. व्हेन इन रोम, डू ऍज अ रोमन्स डू.’ पुण्यातल्या गोष्टी पुण्यात, त्या मुंबईत आणायच्या नाहीत. बाकरवडीदेखील नाही. ती पुण्यात लागते तशी मुंबईत लागत नाही. पुण्यातले पेढे खाऊन मुंबईतला आनंद साजरा होत नाही. मुंबईतली मुलगीही पुण्यात नांदत नाही. (हे तेजश्री प्रधानला उद्देशून मुळीच नाही.)
एक गुपित सांगतो, कोणाशीही बोलायचं नाही. माझा जन्म व बालपण पुण्यातलंच. बोललात कोणापाशी तर दाखवीन माझा पुणेरी हिसका!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या