श्रीमंती

1514

>> शिरीष कणेकर

मध्यमवर्गीय मराठमोळय़ा माणसाच्या श्रीमंतीच्या कल्पना मुक्रीपेक्षाही खुज्या असतात. मला असं वाटत आलंय की मी एवढं श्रीमंत व्हावं की वाटेत लागलेल्या आइसक्रीमच्या दुकानात लागोपाठ तीन आइसक्रीम खाऊन रुबाबत बिल देऊन बाहेर पडावं. बिलाचं अशासाठी सांगितलं की, मागे मी एक आइसक्रीम खाऊन तसाच पळून गेलो होतो. अर्थात ती श्रीमंत होण्यापूर्वीची गोष्ट. एकदा मी फीत कापून एका दुकानाचं उद्घाटन केलं होतं. त्या कात्रीची धार आता कमी झाल्येय. दुधाच्या पिशव्या पण नीट कापता येत नाहीत. फीत किती मस्त कापली गेली होती. श्रीमंत झाल्यावर (गालगुंड झालं, गोवर झाला, फ्लू झाला, मधुमेह झाला, रक्तदाब झाला पण श्रीमंत काही अजून झालेलो नाही. तशी श्रीमंती कोपऱयापर्यंत येते पण माझ्या घरी डोकावत नाही.) मी ‘ताज’ हॉटेलचा केशकर्तन कलाविशारद हकीम याच्याकडे केस कापून घेणार आहे. (फोटो यथावकाश ‘व्हायरल’ होतीलच.) त्याच्या खुर्चीत रेलून बसायचं आणि एवढंच सांगायचं – ‘श्रीमंत लोगो जैसा कट करो.’ जरा घाई करायला लागेल. ऑफिसेस सुटली की बसला गर्दी होईल. हे श्रीमंत लोक कसं जमवतात? अर्थात मी श्रीमंत झाल्यावर मला सगळं आपसूकच कळेल. आम्ही सगळे श्रीमंत संध्याकाळी आझाद मैदानावर जमू व चणे-फुटाणे खात कुठे जायला कुठली बस पकडायची या माहितीची देवाणघेवाण करू. मुकेश अंबानीना ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या सीटवर बसता येईल. अनिलला मात्र उभं रहावं लागेल. सॉरी, ओल्ड बॉय!

माझा एक श्रीमंत मित्र अमेरिकेत असतो. (इथे चुनाभट्टीला राहून काय श्रीमंत होणार?) तो आम्हा मित्रांना चकवून गाडीवर पाणी-पुरी व पाव-भाजी खायचा. तेव्हाच मी ओळखलं होतं की हा अमेरिकेला जाणार व श्रीमंत होणार. ज्या ‘बायलेन’मध्ये त्याचा राजेशाही, आलीशान, टोलेजंग प्रासाद आहे त्या बोळकंडीला त्याचं नाव देण्यात आलंय- ‘सतीश आर. कुलकर्णी ड्राइव्ह.’ अमेरिकेत म्हणे अशा छोटय़ा रस्त्यांच्या नामकरणासाठी बोली लावली जाते. सर्वात जास्त रकमेची बोली लावणाऱयाचं नाव त्या रस्त्याला ठरावीक काळासाठी देण्यात येतं. माझ्या मित्राच्या नावाच्या पाटीखाली उभं राहून मी फोटो काढून घेतला. माझ्या मनाची श्रीमंती; दुसरी कुठली श्रीमंती नसते तेव्हा मनाची श्रीमंती दाखवण्याखेरीज गत्यंतर नसते.

त्याच्या गॅरेजमध्ये चार मोटारी दिमाखात उभ्या होत्या. (आपली चार कुटुंबं तेवढय़ा जागेत राहिली असती.)‘दोन मुलांच्या व दोन तुमच्या वाटतं?’ मी कौतुकानं ओथंबलेल्या आवाजात विचारले. जळल्याचा करपट वास येऊ नये म्हणून कौतुकाचं कवच.
‘नाही-नाही’ सतीशची (श्रीमंत) बायको म्हणाली, ‘मुलांच्या वेगळय़ा आहेत. या आमच्या आहेत.
‘अरे वा!’ मी म्हणालो. काय अरे वा, माझा लुब्रा आवाज मलाच ओळखू येत नव्हता. पण मी तरी दुसरं काय म्हणणार होतो?
‘त्यातली ‘मर्सिडीज’ व ‘फरारी’ सतीश शनिवार-रविवारी काढतो.’ बायको म्हणाली.
‘शिरीष, तू मुंबईत गाडीनंच फिरत असशील ना?’ माझ्या मित्रानं ‘फरारी’नं फिरत असताना अनपेक्षितपणे विचारले.
‘अर्थातच.’ मी सहजगत्या म्हणालो, ‘फक्त कोणी मला त्याच्या गाडीत बसू द्यायला हवं.’
परवा मी एक बातमी वाचली. (ती मी लिहिलेली नसल्यानं खरी असण्याची शक्यता वाढते.) सौदी अरेबियात एक श्रीमंत माणूस होता. सौदी अरेबियात आणि श्रीमंत माणूस ही पिवळा पितांबर किंवा वटवृक्षाच्या झाडाखाली यासारखी द्विरुक्ती होते. तिथला प्रत्येक माणूस श्रीमंतच असतो. एका वेळेला तीन तीन आईसक्रीम आरामात खाऊ शकतो. सौदीमधला (ट्रीम सौदी वेगळा. न्यूझीलंडचा.) भिकारी भीकदेखील हजार-हजार रियालची मागतो. भीक मागून मागून तो श्रीमंत होत असला पाहिजे. त्याची मुलंबाळं ‘या कटोऱयात बाबा भीक मागायचे’ असे मित्रमंडळींना दाखवत असतील. माझी मुलंही ‘पपांनी हॉटेलमधून मारलेला पहिला नॅपकिन’ कालपरवापर्यंत दाखवायची. मुलांना बापाच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान असलाच पाहिजे.

तर या श्रीमंत माणसानं- आपण त्याला सतीश कुलकर्णी म्हणूया- एअरबस 300च्या ऑफिसात फोन केला. त्याला त्याच्या लाडक्या मुलाला वाढदिवसाप्रीत्यर्थ भेट म्हणून देण्यासाठी दोन खेळण्यातली पण ओरिजिनलची सहीसही प्रतिकृती असलेली मॉडेल विमानं हवी होती. एअरबसवाल्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्या सतराशे साठ प्रश्नांनी खरं म्हणजे ‘कुलकर्णी’ हैराण झाला. मुलावरील प्रेमापोटी त्यानं हा प्रश्नांचा भडीमार सहन केला. त्यातून त्याची इंग्लिशची बोंब होती. (याही कुलकर्ण्याची?) अखेर सौदा ठरला. बिलचं ‘एस्टिमेट’ आलं. कुलकर्णीला ते जरा जास्तच वाटलं. पण मुलासाठी चलता है. त्यानं ‘अमेरिकन एक्सप्रेस’ कार्डनं मॉडेल विमानांची किंमत चुकती केली. ‘कोण उडविणार?’ त्याला विचारण्यात आलं. ‘कुलकर्णी’ला तो विनोद वाटला.

तो विमानं आणायला गेला. त्याच्या समोर दोन अजस्त्र्ा एअरबसची चकाचक नवीन कोरी विमानं उभी होती. (आणि त्याला त्यांची किंमत ‘जरा’ जास्त वाटली होती.) त्यानं एक मुलासाठी व एक चुलतभावासाठी घेतलं. माझ्या चुलतभावानं लग्नात मला पेन्सिल भेट म्हणून दिली होती. तीही एका टोकाला रबर नसलेली. थांबा, मला श्रीमंत होऊ द्या. मी त्याला त्याच्या मुलाच्या लग्नात रबरवाली पेन्सिल व प्लास्टिकची सहा इंचांची फुटपट्टी भेट म्हणून देईन. जगाला कळू द्या की आम्ही होऊ घातलेले श्रीमंत किती दिलदार असतो ते…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या