
>> शिरीष कणेकर
माझी मान मी आज खाली घातल्येय. खरं म्हणजे मी काहीच केलेलं नाही. तिची तीच खाली गेल्येय. मनात दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेला फक्त मानेनं काय तो प्रतिसाद दिलाय. आजवर शमशाद बेगमवर एक ओळही न लिहिल्याचा अपराधीपणा. आय प्लीड गिल्टी. मला जामीनदेखील नाकारा.
लता म्हणजे लता याबद्दल माझ्या (व संगीतकारांच्याही) मनात यत्किंचितही संदेह नाही. ‘लता गाती है, बाकी सब रोती है!’ असं आमचा म्होरक्या संगीतकार सज्जाद हुसेन यानं म्हणून ठेवल्यावर आम्ही कशाला काही वेगळं बोलायला हवं होतं? ‘हिटलर’नं फर्मान काढलेलंच होतं. होय, लताशी इमान राखण्यासाठी आम्ही दुनियेशी बेइमानी केली. पण लता होतीच ना हो सोनपुतळी? तिच्या दरबारात एकदा गुलाम झालेला माणूस गुलामगिरीची वस्त्रs स्वेच्छेनं व आनंदानं परिधान करायचा. मी त्यातलाच एक. पण म्हणजे इतर कोणा स्त्रीकंठाला गायचा अधिकारच नव्हता का? त्यांची छोटी असतील, पण संस्थानं होतीच ना? त्यांनीही कर्तृत्व दाखवलं होतंच ना? त्यांनाही निष्ठावंत श्रोते होतेच ना? त्यांनीही ठसा उमटवला होताच ना? काय बोलताय? बोलणारे काही बरळतील, पण आपल्या कानांनी ते ऐकावंच कशाला? शारदा व कमल बारोट गात असल्यागत कानांवर हात ठेवावेत. आपण आत्ता राजकुमारी, सुरय्या, गीता दत्त, शमशाद या गानकोकिळांविषयी बोलतोय. यहाँ टिटवीयों का क्या काम रे…!
मी हिंदी चित्रपट संगीताच्या महासागरात नौकानयन करायला उतरलो तेव्हा येणारी प्रत्येक लाट लताचं नाव घेऊनच येत होती. मी माझी नौका धक्क्याला लावून संगीतश्रवण करत होतो, तेव्हाही पार्श्वगायनाच्या क्षेत्रात लताच अनभिषिक्त सम्राज्ञी होती. अशा वेळी शमशादसारख्या बहुगुणी, कर्तृत्ववान गायिकेकडे दुर्लक्ष होणं समर्थनीय नाही, पण क्षम्य होतं.
परवा शमशादवरचा एक कार्यक्रम ऐकता ऐकता मी तडपून उठलो. काय कर्तृत्व होतं या बाईचं. हिंदी, मराठी, पंजाबी, गुजराती, तामीळ या भाषांतून बाईनं सहा हजारांवर गाणी गायली. खायचं काम नाही. तिच्या काळात ती सार्वभौम होती. त्या काळातली लता होती म्हणा ना. लता आली आणि छा गयी, पापे. अशा अद्भुत आवाजासाठी व तयारीच्या गायकीसाठी परमेश्वराची करुणा भाकणारे तमाम संगीतकार वेडे झाले. शमशादची पीछेहाट सुरू झाली.
लता व शमशाद यांची अगदीच तुरळक द्वंद्वगीते आढळतात. उदा. ‘प्यार के जहान की निराली’ (‘पतंगा’- सी. रामचंद्र- 1949), ‘किसी के दिल में रहना था’ (‘बाबुल’- नौशाद- 1950), ‘तेरी महेफिल में किस्मत’ (‘मुगल-ए-आझम’- नौशाद- 1960). म्हणजे पन्नास ते साठ या दशकात दोघी एकत्र गायल्याच नाहीत? लता व शमशाद याचं फारसं सख्य नसावं या शंकेला वाव आहे. शमशादच्या पदरात पडू शकली असती अशा गाण्यांचा ओघ लताकडे वळला हे शमशादच्या रोषाचे कारण असू शकेल.
शमशाद ठणठणीत गायची. तिच्या आवाजात चोरटेपणाचा लवलेश नव्हता. गाण्यात एक प्रकारची अनोखी झिंग होती. ती कुठंही गाणं शिकलेली नव्हती. जे काय होतं ते उपजत होतं. तिच्या अतिकर्मठ वडिलांना गाण्याबजावण्यासारख्या विलासी कलांचा तिटकारा होता. मुलीचा कल बघून त्यांनी तिला गायची परवानगी दिली. मात्र चेहरा कॅमेऱ्याला दाखवायचा नाही, बुरखा घालून गायचं. लाहोरला जन्मलेली शमशाद गुलाम हैदरसमवेत मुंबईला आली आणि परत गेलीच नाही. मुंबईनं व हिंदी चित्रपटसृष्टीनं तिला आपलंसं केलं. तिच्या एका गाण्यात मदन मोहन व किशोरकुमार कोरसमध्ये होते. ती किशोरला म्हणाली, ‘माझे शब्द लक्षात ठेव. भविष्यात तू फार मोठा गायक होशील.’
नौशादला शमशादचं भारी कौतुक होतं. माझ्याजवळ बोलताना म्हणाला होता- ‘शमशाद को सुनो. सणसणीत आवाज. उसे स्टुडियो के बाहर खडे करके गवाओ, कोई फर्क नहीं पडता.’ मला विचारावंसं वाटलं की, मग लताला एवढी खंडीभर गाणी का दिली? शमशादला द्यायची.
माझ्या मनात एवढी कडवट प्रतिक्रिया निर्माण होण्याची काय गरज होती? हा दुष्टावा कशासाठी? शमशाद बिचारीने माझं काय घोडं मारलं होतं? पण नौशादनंही मधुबालासाठी लताचा व सहनायिका निगार सुलतानासाठी शमशादचा आवाज वापरला होता. पाइंट टु बी नोटेड…
शमशादच्या या सदाबहार गाण्यांवर एक नजर टाका –
” ‘सावन के नजारे है’ – ‘ खजांची’- गुलाम हैदर- 1941, ” ‘जब उसने गेस बिखराये’- ‘शाहजहान’- नौशाद-1946, ” ‘चाँदनी आयी बनके प्यार’ – ‘दुलारी’- नौशाद-1949, ” ‘कभी आर कभी पार’- ‘आरपार’- ओ. पी. नय्यर- 1954, ” ‘ये दुनिया रुप की चोर’- ‘शबनम’- ओ. पी. नय्यर-1949, ” ‘मेरे पिया गये रंगून’- ‘पतंगा’- सी. रामचंद्र- 1949, ” ‘एक तेरा सहारा’- ‘शमा’- गुलाम महंमद-1946, ” ‘नैना भर आये नीर’- ‘हुमायू’- गुलाम हैदर- 1945, ” ‘छोड बाबुल का घर’ – ‘बाबुल’- नौशाद- 1950, ” ‘चमन में रह के वीराना’- ‘दीदार’- नौशाद- 1951, ” ‘एक दो तीन’- ‘ आवारा’- शंकर-जयकिशन- 1951
शमशादच्या म्हातारपणी तिची लेक उषा रात्रा तिला ट्रेनमधून गावी घेऊन चालली होती. शमशाद खिडकीला डोकं टेकून पेंगत होती. लेडीज डब्यात चित्रपटांतील गाण्यांच्या भेंड्या रंगल्या होत्या. उषा त्यात हिरीरीनं भाग घेत होती. डब्यातली एक बाई तिला म्हणाली, ‘तुमच्या आई गातही नाहीयेत व ऐकतही नाहीयेत. त्यांना हिंदी चित्रपट संगीतात काहीच इंटरेस्ट दिसत नाही.’ शमशादची मुलगी हसली व एवढंच म्हणाली, ‘नसतो काही लोकांना इंटरेस्ट!’
हिंदी चित्रपटात 1287 गाणी गाणारी बेखबर शमशाद पेंगत होती.
– आता करू मी माझी मान वर?