
>>शिरीष कणेकर
चला, मधमाश्यांच्या पोळय़ावर दगड मारू या. बरेच दिवस झाले ही आगळीक हातून घडलेली नाही.
सांगा, तुमच्या मते हिंदी चित्रपटांतील सर्वोत्कृष्ट संगीतकार कोण? मला माहित्येय, तुमच्यातील प्रत्येकाचे यावर ठाम व आग्रही मत असणार. रवी, चित्रगुप्त, इक्बाल कुरेशी व बुलो सी. रानी यांना उराशी घेऊन आखाडय़ात उतरणारे संगीतप्रेमीही आढळतील.
नमनाला एवढे तेल घालून मी मुद्दय़ावर येतो (नंतर गुद्दय़ावर यायचं आहेच). माझे तीन सर्वाधिक आवडते संगीतकार आहेत- मदन मोहन, शंकर-जयकिशन व रोशन (नॉट नेसेसरिली इन धिस ऑर्डर).
मदन मोहनच्या गाजलेल्या गजला तर वेड लावतातच, पण त्याचे ‘गेटवे ऑफ इंडिया’मधले अप्रसिद्ध गाणे ‘न हँसो हम पे हम है जमाने के ठुकराए हुवे’ खुळावून सोडते. त्यातून समोर पडद्यावर मधुबाला आहे. सज्जादचे ‘ये हवा ये रात ये चांदनी’ उचलून मदन मोहनने ‘आखरी दाव’मधले रफीचे ‘तुझे क्या सुनाऊं मैं’ दिले हे मदनने स्वतःच्या तोंडाने सांगूनही खरे वाटत नाही. कारण मदन मोहनच्या उचलेगिरीलाही मदन टच आहेच.
दत्तारामने (वाडकर) कमी असेल, पण चमकदार संगीत दिले. अख्खा ‘परवरीश’ त्याचा, मिस्टर! दुर्दैवाने तो कायम शंकर-जयकिशनचा सहाय्यक म्हणून ओळखला गेला. शेवटच्या वाईट दिवसांत तो जुहूला चाळीत एका खोलीत राहत होता. तिथेच तो मला सांगत होता, ‘आमच्या चाळीमागेच महंमद रफीचा बंगला होता. सकाळी बंगल्याच्या आवारात रफी फिरायचा. आम्ही एकमेकांना पाहायचो व हात करायचो.’
‘मी दारूच्या थेंबालाही शिवायचो नाही.’ दत्ताराम सांगत होता. ‘एकदा आर. के. कॉटेजमध्ये पार्टी होती. शंकर, जयकिशन… सगळे होते. राजसाहेबांनी दारूचा ग्लास भरला व माझ्यासमोर धरला. राजसाहेबांना नाही कसे म्हणणार? त्या दिवशी दारू जी सुरू झाली ती झाली…’
अनिल विश्वास, सज्जाद, नौशाद, विनोद (ऊर्फ एरिक रॉबर्टस्) या महान संगीतकारांपैकी एकाचाही मी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून गौरवाने उल्लेख का केला नाही? आता विनोदचे लखलखीत उदाहरण घ्या. लता त्याला गुणांची खाण म्हणायची. ‘लारेलप्पा लारेलप्पा’ (‘एक थी लडकी’ 1949) देणारा विनोद विस्मृतीत जावा? ‘मेरी उल्फत सोई है यहां’ (‘उटपटांग’-लता), ‘मेरे दिल के तडपने का तमाशा’ (‘सब्जबाग’-लता), ‘कागा रे’ (‘वफा’-लता) ही अजरामर गाणी देणारा विनोद सर्वोच्च संगीतकारांत का मोडत नाही? सांगतो. ‘क्वॉलिटी’ महत्त्वाची खरीच, पण ‘क्वांटिटी’ हीही उपेक्षणीय गोष्ट नाही. सर्वोत्तम म्हणवून घेण्यासाठी परिप्रकारची उत्कृष्ट, दर्जेदार व लोकप्रिय गाणी वर्षानुवर्षे सातत्याने देणे अगत्याचे ठरते. कारणं काहीही असतील, पण विनोद व सज्जादसारख्या अभिजात संगीतकारांच्या वाटय़ाला जेमतेम मूठभर चित्रपट आले. त्यातले बहुसंख्य नगण्य होते. विनोदला दिलीप कुमार, राज कपूर व देव आनंद हे तत्कालीन आघाडीचे अभिनेते एकदाही मिळाले नाहीत. आर. सी. बोरालचे ‘दर्द-ए-दिल’मधले ‘न तो दिनही दिन मेरे रहे’, जमाल सेनचे ‘शोखियाँ’मधले ‘सपना बन साजन आये’, आदिनारायण रावचे ‘सुवर्णसुंदरी’मधले ‘कुहू कुहू बोले कोयलिया’ ही गाणी कुणाच्याही तुलनेत कमी नसली तरी त्यांच्या बळावर ते गुणी संगीतकार सर्वश्रेष्ठ ठरत नाहीत. डू यू गेट माय पॉइंट?
मदन मोहन तर गजलांचा सरताज होता, पण रोशन व सी. रामचंद्र तगडे स्पर्धक म्हणून तुम्हाला कसे वाटतात? रोशनसाठी तर जीव तुटतो. त्याने काही करायचे बाकी ठेवले नाही. अगदी काही नाही. ‘हम लोग’, ‘बावरे नैन’, ‘मल्हार’, ‘नौबहार’, ‘रागरंग’, ‘चांदनी चौक’, ‘टकसाल’, ‘अजी बस शुक्रिया’, ‘बरसात की रात’, ‘आरती’, ‘दिल ही तो है’, ‘ताजमहाल’, ‘चित्रलेखा’, ‘ममता’ ही सगळी संगीतरत्ने रोशनची.
शंकर-जयकिशनच्या संगीतातली हिट व श्रवणीय गाणी सांगत बसणे म्हणजे गव्हाच्या पोत्यातला एकेक दाणा मोजत बसण्यासारखे आहे. जीव ओतून संगीत देणे हे त्यांनी केवळ राज कपूरच्या चित्रपटांच्या बाबतीत नाही तर इतरांच्याही बाबतीत केले. एकेका वर्षात अर्धा डझन सुपरहिट संगीत दिलेले चित्रपट? 1953 साली ‘नया घर’ हा अप्रसिद्ध चित्रपट. आज त्यातली गाणी ऐकाल तर चाट पडाल. जयकिशन 1971 साली गेला. शंकर 1986 साली निवर्तला. त्या दोघांना जोडणारा ‘हायफन’ होता तोवर त्यांनी थैमान घातले. भले- भले संगीतकार वाटय़ाला येईल ते चित्रपट करीत राहिले. हुस्नलाल-भगतराम तर गाशा गुंडाळून गावी निघून गेले.
लताच्या आवाजात ‘यहुदी’मधले गाणे आपण त्यांना म्हणू या – ‘आँसू की आग लेके तेरी याद आयी!’






























































