
सामना प्रतिनिधी । शिरूर
तालुक्याच्या पश्चिमेकडील बेट भागातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या जांबुत येथे अपुऱ्या वीज पुरवठ्याने जांबूतची पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा वेळ वाढविण्याची ग्रामपंचायतीने शिरूर तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
जांबुत येथे सध्या फक्त २ तासच ३ फेज वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील पाणी पुरवठा योजनेची टाकी भरण्यासाठी किमान ६ तासांचा अवधी लागतो. मात्र येथे ४ तासच वीज उपलब्ध असल्याने योग्य तो पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत असून पाण्यासाठी नागरिकांची आरडाओरड होत आहे. अनेक शेतकर्यांना ही ३ फेज वीज उपलब्ध असलेल्या ४ तासात पाणी घेणे जिकरीचे ठरत आहे. त्या करिता ३ फेज वीज पुरवठा ८ तास करण्यात यावा अशी मागणी सरपंच डॉ. जयश्री जगताप यांनी केली निवेदनाद्वारे केली आहे.
जांबुत ग्रामस्थांची ८ तास ३ फेज वीज पुरवठा करण्याच्या मागणीची सध्यस्थितीत पूर्तता करता येणार नसल्याचे तहसीलदार गुरु बिराजदार यांनी सांगितले आहे. तसेच कुकडी नदीला सोडलेले आवर्तन हे फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच असून उर्वरित एप्रिल,मे व जून महिन्यात दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेता पिण्याच्या पाण्यासाठी नदीवरून पाणीपुरवठा असणाऱ्या गावांनी योग्य त्या उपाययोजना करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले.


























































