गद्दार वाकचौरे येणार म्हणून शिवसैनिकांना ठेवले नजरकैदेत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गद्दार खासदार भाऊसाहेब वाकचौरे आज शिर्डीत येणार असल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱयांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ज्या शिवसैनिकांमुळे वाकचौरे खासदार झाले, त्यांनाच नजरकैदेत ठेवल्यामुळे हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न राहत नाही, तर लोकशाहीच्या मूल्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतो, अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

खासदार वाकचौरे यांनी पक्षांतर केल्यानंतर ते आज शिर्डी येथे येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्याचे समोर आले आहे. यात शहरप्रमुख गगन हाडा, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, आबासाहेब पवार यांचा समावेश होता.

शिर्डी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गगन हाडा आणि बाळासाहेब जाधव यांना पोलीस बंदोबस्तात बैठकीसाठी नेण्यात आले. यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.

दरम्यान, ‘लोकांच्या मतांवर निवडून यायचे, कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून यांना संसदेत पोहोचायचे आणि नंतर राजकीय सोयीसाठी यांनी पक्ष बदलायचा; पण ज्यांनी निवडून आणले त्यांनाच गुन्हेगारासारखी वागणूक द्यायची, हा कुठला न्याय’, असा संताप शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे. जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध करत, ‘द्रोह करणाऱयांना पोलीस संरक्षण आणि
निष्ठावंत शिवसैनिकांना स्थानबद्धता, ही लोकशाहीची विटंबना आहे’, असा संताप व्यक्त केला.