राजकारण सुरुच राहणार, पण जनतेला दिलेली वचनं पूर्ण करण्याची जबाबदारी आपली! – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुणाची सत्ता येणार किंवा सरकार येणार असे राजकारणात चालूच राहणार आहे. परंतु सत्तेत असो की विरोधी पक्षात असो, जनतेला जी वचने आपण दिलेली आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. नेमकी हीच शिकवण आजोबांनी म्हणजेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. म्हणूनच कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांची सेवा करावी आणि त्याच दिशेने शिवसेनेचा प्रवास सुरु असल्याचे प्रतिपादन शिवसेना युवा नेते अदित्य ठाकरे यांनी केले. विदर्भात दिवसभर रिमझिम पाऊस सुरु असतांनाच आदित्य ठाकरे यांची ‘जनआशिर्वाद’ यात्रा मंगळवारी रात्री अमरावती शहरात दाखल झाली. नवाथे प्लॉट येथे आयोजित जाहीर सभेत आदित्य ठाकरे बोलत होते.

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते येतात, आश्वासने देतात नंतर गायब होतात. पण शिवसेना मात्र 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण या तत्वावरच चालत आली आहे. 24 तास काम करतांनाच 365 दिवस सर्वांच्याच संपर्कात राहणे ही शिवसेनेची भूमिका आहे. म्हणूनच मते देणाणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी व न देणाऱ्यांची मने जिंकण्यासाठीच ही जनआशिर्वाद यात्रा असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेनेने काढलेली आशिर्वाद यात्रा नसून ती सध्या तिर्थयात्रा झाली आहे. देवळात देव असतो आपण त्यांना नमस्कार करतो पण खरा देव जनता जनार्दनात आहे. हेच आपल्याला यात्रेच्या निमित्याने दिसून येत आहे. म्हणूनच ती आता तिर्थयात्रा झाल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, यासाठी तुमचे प्रेम व आशिर्वाद हवे आहेत. असा महाराष्ट्र घडवितांना तो माझ्या एकट्याच्या भरवश्यावर घडविता येणार नाही. म्हणूनच तुम्हा सर्वांची साथ आणि हाथ हवे आहेत. आजोबाच्या (शिवसेना प्रमुखांच्या) झालेल्या संस्कारातूनच मी राजकारण शिकलो आहे. समाजकारणासोबत राजकारण शिकतांना आपले दैवत हे जनताच असून त्यांचे आशिर्वाद घेण्याकरीता ही यात्रा असल्याचे ठाकरे म्हणाले.

यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, राज्यमंत्री संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसुळ, प्रिती बंड, माजी आमदार धाने पाटील, जिल्हाप्रमुख सुनील खराटे, कृऊबाचे संचालक नाना नागमोते, मनपा गटनेते दिनेश बूब, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश वानखडे, शाम वानखडे, शहर प्रमुख प्रविण हरमकर यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक व मोठ्या संख्येने शिवप्रेमी जनता यात्रेच्यावेळी हजर होती.