पालिका शाळांमध्ये समुपदेशकांची नियुक्ती करा! शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालिका शाळेत शिकणारे विद्यार्थी हे आर्थिक दुर्बल घटकातील असतात. कुटुंबाची परिस्थिती आणि समाजातील वाईट गोष्टींचा ताण त्यांच्या मानसिकतेवर पडतो. याचा गंभीर परिणाम त्यांच्या अध्ययन कौशल्यावर होतो. त्यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करा अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

पालिकेच्या 1187 शाळा असून यामध्ये 12 हजार शिक्षक प्राथमिक-माध्यमिकच्या 2 लाख 96 हजार 815 विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. मात्र इतक्या मोठय़ा संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असताना शाळांमध्ये समुपदेशक का नाही असा सवाल शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी शिक्षणाधिकारी महेश पालकर यांना निवेदन देऊन समुपदेशक नेमण्याची मागणीही केली आहे. काही दिवसांपूर्वी के. डी. गायकवाड पालिका शाळेतील विद्यार्थिनीवर शिक्षकाने हात उचलल्याने मानसिक तणावाखाली गेलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे त्यांनी निवेदनात निदर्शनास आणून दिले आहे.

पालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा आणि उत्तम शिक्षण दिले जात असताना समुपदेशक नसल्यामुळे विद्यार्थी बाहेरील खोटय़ा आकर्षणाला बळी पडत आहेत. त्यामुळे समुपदेशक नेमल्यास विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेऊन मार्गदर्शन करणे सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे आत्महत्या आणि विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण टाळणे शक्य होणार असल्याचे दुर्गे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या शालेय विभागासाठी अर्थसंकल्पात 2570 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे समुपदेशक नेमण्यात आर्थिक अडचण येणार नसल्याचेही दुर्गे यांनी म्हटले आहे.