
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘होऊ द्या चर्चा’ अभियानाला सोलापूर शहरामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाल़ा एका वर्षात इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधणार होता. तसेच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधणार होता, त्याचे काय झाले, असा सवाल माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी मोदींना केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ‘बोल घेवडय़ांचा भंडाफोड, होऊ द्या चर्चा’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील प्रभाग 17 मधील कुंभार गल्ली येथे जनतेशी संवाद साधताना थेट मोदींनाच माजी मंत्री खंदारे यांनी स्मारकाबाबत सवाल केले. यावेळी जनतेनेही केंद्र सरकारने त्यांच्या भावनांचा खेळ केल्याचे बोलून दाखविले.
विवेकानंद डुकरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. याप्रसंगी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, उपशहर प्रमुख नाना मोरे, विवेकानंद कंदकुरे आणि शिवसैनिक संख्येने उपस्थित होते.
वाढत्या महागाईला भाजप सरकार जबाबदार
वाढत्या महागाईला भाजप सरकारच जबाबदार आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केली. ते ‘होऊ द्या चर्चा’ या अभियानांतर्गत राधानगरी तालुक्यातील गावांमध्ये जनतेशी संवाद साधताना बोलत होते.
तालुक्यातील शेळेवाडी, चंद्रे, कळंकवाडी, कासारपुतळे येथे ‘होऊ द्या चर्चा अभियाना’ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रकाश पाटील म्हणाले, ‘2014 ला नरेंद्र मोदी यांनी देशाला फसवणाऱया अनेक घोषणा केल्या. वाढत्या महागाईला भाजप सरकारच जबाबदार आहे. सर्वसामान्य माणसाला फसवण्याचा धंदा नरेंद्र मोदी यांनी केला, म्हणूनच हीच वेळ आहे भाजपला त्यांची जागा दाखवून द्यायची. यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख दीनानाथ चौगले, करवीर संपर्कप्रमुख सुरेश चौगले, उत्तम पाटील, भिकाजी हळदकर, रंगराव पाटील, के. के. राजीगरे, बाबूराव बसरवाडकर, सागर भावके, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.



























































