
सामना ऑनलाईन । मुंबई
बेरोजगारी हटवणार अशा घोषणा देऊन सत्ता मिळवायची आणि नंतर ‘जुमला’ म्हणून तरुणांना वाऱ्यावर सोडायचं अशा राजकीय पक्षांना घाम फोडणारी ही बातमी आहे. कोल्हापूर येथे ६ ऑक्टोबर २०१८ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात २२९७ जण नोकरीसाठी पात्र ठरले. आता पुढला मेळावा मुंबई उपनगरात भरवण्यात येणार आहे.
शिक्षण घेऊनही नोकरी नाही, अशी विचित्र परिस्थिती राज्यात असताना शिवसेनेनं पुढाकार घेत राज्यात रोजगार मेळावे भरवले आहेत. पुणे, वाशी, नाशिक पाठोपाठ कोल्हापूरमध्ये मेळाव्यासाठी नोंदणी केलेल्या १२००० पैकी ४००० जणांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली आणि मेळाव्यात २२९७ जण नोकरीसाठी पात्र ठरले. पुढील मेळावा मुंबई उपनगरात घेतला जाणार आहे. या मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. तसेच टप्प्या टप्प्याने संपूर्ण राज्यात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावे घेतले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे.
उद्योजकांना व्यवसाय करणे सोपे व्हावे यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या काळात आवश्यक असणाऱ्या ७५ परवानग्यांची संख्या १५ वर आणण्यात आली आहे. पक्षीय आणि शासकीय अशा दोन्ही पातळींवर रोजगार मेळावे घेऊन बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे.































































