
महाराष्ट्र दुश्मना पुढे झुकणार नाही, वाकणार नाही. महाराष्ट्र लढत राहील स्वाभिमानासाठी, हक्कासाठी, कष्टकऱ्यांसाठी. दुश्मन अंगावर आला तर त्याची बोटं छाटली जातील. शिवचरित्राचा इतिहास साऱ्यांना माहित आहे. शिवसेना आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांनी हा धडा लक्षात घेतला पाहिजे, असा खणखणीत इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
शिवसेनेला हिंदुत्त्वावरून लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला त्यांनी पुन्हा एकदा कडक शब्दात सुनावले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. पण महाराजांचं स्मरण महाराष्ट्राला रोजच होत असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या दुश्मनांना जो एक धडा 400 वर्षांपूर्वी घालून दिला तो असा आहे की महाराष्ट्र दुश्मना पुढे झुकणार नाही, वाकणार नाही. महाराष्ट्र लढत राहील स्वाभिमानासाठी, हक्कासाठी, कष्टकऱ्यांसाठी. दुश्मन अंगावर आला तर त्याची बोटं छाटली जातील. प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळाच निघाला. 25 वर्षे लढून सुद्धा औरंगजेबाला या महाराष्टातच मृत्यू पत्करावा लागला हा शिवचरित्राचा इतिहास साऱ्यादेशाला माहित आहे. हा धडा शिवसेना आणि महाराष्ट्राच्या दुश्मनांनी समजून घेतला पाहिजे’, असे ते म्हणाले.
शिवसेना, भगवा आणि हिंदुत्त्व याची त्यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली. ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार आणि प्रेरणेतून शिवसेना स्थापन केली. हा भगवा जो फडकतो आहे, आणि सगळ्यांना भगव्याचे जे प्रेम अचानक उफाळून आले आहे त्याचे प्रमुख प्रेरक होते ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. त्याच्यामुळे कुणाला वाटत असेल तर दिल्लीतील सत्तेचा वापर करून महाराष्ट्रातील नेत्यांना आम्ही गुढगे टेकायला लावू तर त्यांनी परत एकदा आजचा अग्रलेख वाचायला हवा आणि शिवचरित्र वाचायला हवे’, असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्र आणि प. बंगालचा स्वभाव एकच!
प. बंगालच्या मुख्यमंत्री यांचा भाचा अभिजित बॅनर्जी याला केंद्रीय तपास यंत्रणांनी दिल्लीमध्ये बोलवले आहे आणि चौकशीचा ससेमिरा सुरू केला आहे. महाराष्ट्रातही तेच सुरू आहे. पण बॅनर्जींनी सांगितले की मी दिल्लीच्या सत्तपुढे झुकणार नाही. महाराष्ट्र आणि प. बंगालचा स्वभाव एकच आहे. क्रांतीकारक आणि लढणाऱ्यांची ही राज्ये आहेत. ती कधीही झुकणार नाहीत.
महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकी प्रांतांना फक्त भूगोल आहे!
छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत जन्म घेतला हे महत्त्वाचे आहे त्यामुळे या महाराष्ट्राला इतिहास. आणि बाकी इतर प्रांतांना भूगोल आहे. महाराष्ट्राला इतिहास का आहे याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला. हे कुणी विसरू नये. ज्यांना त्यांच्या नावाने राजकारण अजून काही करायचे ते करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व महान आणि थोर आहे की त्यांनी संपूर्ण देशाला दिशा दिली आहे.
निधीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारात आहे!
निधीसंदर्भातील निर्णय हा मुख्यमंत्र्यांच्या दरबारात आहे. शिवसेनेचे आमदार आणि खासदार यांना पुरेसा निधी देण्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील.






























































